शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (09:16 IST)

'बागेश्वर धाम सरकार' धीरेंद्र शास्त्रींना आव्हान देणारे श्याम मानव कोण आहेत

facebook
दिवस आषाढी एकादशीचा.पंढरपुरात एका संतपुरुषाला कुणीतरी विचारले, बाबा देवदर्शन घेऊन आलात का देवळातून? त्यावर, माणसांनी फुललेल्या चंद्रभागेच्या पात्राकडे आणि घाटाकडे हात दाखवून ते बाबा म्हणाले, “हा समोर जागता बोलता नाचता विठ्ठल दिसत असता, देवळात जायचेच कशाला? देव देवळात बसलाय वाटतं? जिकडं नजर टाकावी तिकडं तो अपरंपार भरलेला आहेच.” हे असं उत्तर पंढरपुरात देणारे ते बाबा होते, संत गाडगेबाबा.
 
सगळ्या महाराष्ट्राला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणारे, बुवाबाजी-पशुबळीसारख्या प्रथांवर कोरडे ओढणारे, स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर महाराष्ट्रभर प्रवास करत कीर्तनं केली होती. 
 
असं करताना त्यांनी श्रद्धाळू लोकांचा बुद्धिभेद केला नाही. लोकांच्या समजुतींना एकदम सुरुंग लावण्याऐवजी त्यांना खरं काय आहे, योग्य काय आहे? हे फक्त दाखवून दिले, त्यांना वाट दाखवण्याचं काम केलं.
 
प्रबोधनकार ठाकरे गाडगेबाबांच्या या वृत्तीबद्दल म्हणतात, “लोकांच्या धर्मश्रद्धेची एखाद्या खाटकासारखी चिरफाड न करता, लेकुराच्या साठी, पंते हाती धरिली पाटी या तुकोक्तीप्रमाणे त्या श्रद्धेला हळुवार बुद्धिवादी वळण लावून ती सत्कारणी लावण्याचाच उद्योग त्यांनी चालवला आहे.” 
 
महाराष्ट्रात अंधश्रद्धांना विरोध करणारी, अनिष्ट प्रथा बंद करणारी ही सुधारणावादातून आलेली ‘प्रथा’ पुढेही सुरू राहिली.
 
अंधश्रद्धेचा वापर करुन लोकांना लुबाडणाऱ्या बुवा-बायांविरोधात महाराष्ट्रानं सर्वात आधी पावलं टाकली, जादूटोणा विरोधी कायदाही इथंच मंजूर झाला आहे. 
 
या सगळ्याची आठवण करुन देण्याची आता वेळ आली आहे कारण सध्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुरू असलेल्या एका वादामुळे. धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरमध्ये घेतलेल्या एका कार्यक्रमानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. 
 
आपण लोकांच्या मनातील ओळखू शकतो असा दावा करणाऱ्या या धीरेंद्र शास्त्री यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आणि समितीचे राष्ट्रीय समन्वयक श्याम मानव यांनी आव्हान दिले आहे.  
धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या मंचावर येऊन हे दावे सिद्ध करावेत, ते सिद्ध झाले तर 30 लाख रुपये देऊ असे अंनिसने सांगितले होते. मात्र धीरेंद्र यांनी ते न स्वीकारता महाराष्ट्रातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात गढा या गावात बागेश्वर धाम नावाने संस्था आहे. 
 
या प्रकरणावरचा वाद गेले काही दिवस वाढत चालला आहे. श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी आणि आता धीरेंद्र शास्त्री यांनीही आपल्याला धमकी आल्याचा दावा केला आहे. त्याविरोधात त्यांनी बमिठा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंद केली आहे.
 
धीरेंद्र शास्त्री यांना आव्हान देणारे श्याम मानव यांची येथे माहिती घेऊ. 
 
कोण आहेत श्याम मानव? 
श्याम मानव हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ, हिप्नोथेरपी तज्ज्ञ आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्वसंमोहनाद्वारे व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळा घेऊन स्वसंमोहनाचे तंत्र अनेकांना शिकवले आहे.
 
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. 
 
श्याम मानव यांचा जन्म 9 सप्टेंबर 1951 रोजी वर्धा जिल्ह्यात देवळी येथे झाला.
 
त्यांचे वडील ज्ञानदेव हे विनोबा भावे यांचे काहीकाळ स्वीय सहायकही होते. ते गांधीवादी होते आणि प्रदीर्घ काळ त्यांना विनोबांबरोबर काम करता आले. श्याम मानव यांच्या आई कमल या शिक्षिका होत्या.
 
गांधीवादाचा आणि पवनार आश्रमातील वातावरणाचा श्याम मानव यांच्यावर प्रभाव पडला. 
इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी नेर येथे त्यांनी इंग्रजी शिकवण्यास सुरुवात केली. 
 
कॉलेज जीवनात तरुण शांती सेना तसेच जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.
 
1975-76 च्या काळात आणीबाणीविरोधात आंदोलन केल्यामुळे त्यांना 9 महिने कारावास भोगावा लागला.
 
त्यांनी लोकमत, तरुण भारत, नागपूर पत्रिका आणि किर्लोस्करसारख्या प्रकाशनांमध्ये लेखन केलं आहे.
 
अंधश्रद्धेविरोधात लढा 
श्याम मानव यांच्या घरात बहुतांश घरांप्रमाणेच अंधश्रद्धेचा पगडा होता. रुढीवादाचा, विविध बाबांचा प्रभाव त्यांच्याही घरावर होता. अनेक प्रश्नांची उत्तरं विज्ञानाकडे नाहीत असंच त्यांचं मत होतं. 
 
1981 साली किर्लोस्कर मासिकात स्तंभलेखक म्हणून काम करत असताना त्यांची विचारवंत बी. प्रेमानंद यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या कार्यक्रमामध्ये मानव यांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली.
 
त्यानंतर श्रीलंकेतील ख्यातनाम विचारवंत डॉ. अब्राहम कोवूर यांच्या पुस्तकांमधून त्यांच्या विवेकवादी विचारांना चालना मिळाली.  
1982 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पाया रचण्यात त्यांचा वाटा आहे.
 
देव आणि धर्माला आपला विरोध नसून देव-धर्माच्या नावाखाली होणाऱ्या लुबाडण्याला आपला विरोध आहे असं ते सांगतात. 
 
जादूटोणा विरोधी कायद्यासाठी योगदान 
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. ही समिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीपेक्षा वेगळी आहे.
 
श्याम मानव आणि नरेंद्र दाभोळकर यांनी या कायद्याच्या निर्मितीसाठी विशेष श्रम घेतले होते.
 
हे विधेयक 2004 साली महाराष्ट्र विधानसभेत आले. मात्र त्याला विरोधही भरपूर झाला. विधानपरिषदेने त्याला मंजूरी दिली नाही. ते 2011 साली पुन्हा मांडण्यात आले.
20 ऑगस्ट 2013 साली डॉ. दाभोळकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या कायद्यासाठी तातडीने वटहुकुम काढला.
 
त्याच वर्षी 18 डिसेंबर रोजी हे विधेयक मंजूर झाले आणि त्याचे कायद्यात रुपांतर झाले.
'महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013' असे त्याचे नाव आहे.  
 
धीरेंद्र शास्त्रींना आव्हान 
नागपूर येथे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे आव्हान देण्यात आलं.  
 
श्याम मानव यांनी काही कसोट्या धीरेंद्र यांच्यासमोर ठेवल्या. ऐनवेळी दहा माणसं तुमच्या समोर आणू. त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचे नाव, फोन नंबर आणि वय ओळखून दाखवावे आणि दुसऱ्या एका खोलीत ठेवलेल्या दहा वस्तू धीरेंद्र यांनी ओळखून दाखवाव्यात.
 
ही क्रिया दोनवेळा सलगपणे व्हावी. त्यातील 90 टक्के जरी उत्तर धीरेंद्र यांना देता आली तर मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रमुख म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन आणि समितीतर्फे 30 लाखांंचं पारितोषिक देईन.
 
पारितोषिक न स्वीकारल्यास आजवर देवाधर्माच्या नावाखाली लुबाडणाऱ्या लोकांचे दावे फोल ठरवण्याचं 40 वर्षे करणाऱ्या या समितीचं काम बंद करेन असंही मानव म्हणाले आहेत. 
दिव्यशक्तीबद्दल बोलताना श्याम मानव म्हणाले, दिव्यशक्ती जगात सिद्ध झालेली नाही. अमेरिका, रशियासारख्या देशांनी यावर काम करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून काहीच निघालं नाही.
 
महाराजांमध्ये दिव्यशक्ती असेल तर देशाच्या सुरक्षेसाठी त्याचा वापर केला असता.  दिव्यशक्तीचा देशासाठी वापर करुन देशात कुठेही बॉम्ब पडणार नाही कारण बॉम्ब कुठे तयार होत आहेत हे त्यांना आधीच समजलेलं असेल. एकही अतिरेकी कारवाई देशात होणार नाही, इतकी ती महत्त्वाची ती गोष्ट आहे. त्यामुळे वैज्ञानिक कसोट्यांवर ती सिद्ध होण्याची गरज आहे. आम्हाला (समितीला) पराभव मान्य करावा लागला तरी जगात भारताचं नाव होईल.” 
 
धीरेंद्र शास्त्री यांनी समितीचं आव्हान नागपुरात स्वीकारलं नाही. मात्र नंतर त्यांनी बागेश्वर धामला या तिथं सिद्ध करू असं सांगितलं. यावर श्याम मानव यांनी आपलं मत मांडलं आहे.
 
ते म्हणतात,"धीरेंद्र शास्त्री यांनी नागपुरात येऊन विविध दिव्यशक्तीचे दावे केले म्हणून आम्ही हे आव्हान दिलं आहे. ते त्यांनी इथंच सिद्ध करावं. त्यांच्या दाव्यांविरोधात जादुटोणा विरोधी कायदा लागू होतो. नागपूरमध्ये त्यांना सर्व संरक्षण आहे. रा. स्व. संघ आणि आंबेडकरी विचारधारा यांचा संवाद इथे होतो, इथे त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करायला काय हरकत आहे?"
धीरेंद्र यांना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही आव्हान दिलं आहे. जोशीमठ इथं घरांमधल्या भिंती धीरेंद्र यांनी चमत्कार करुन भरल्या तर आपण त्यांचं स्वागतच करू असं ते म्हणाले आहेत. 
 
ते म्हणाले, “आम्ही त्यांच्यासाठी फुलांच्या पायघड्या घालू, या आमच्या घरांना, मठांना ज्या भेगा पडल्या आहेत त्या भरुन द्या.” ते म्हणाले, “सगळ्या देशातल्या जनतेला चमत्कार हवा आहे, एखादा चमत्कार व्हावं असं लोकांना वाटतंय. कुठं होतायत चमत्कार, जे चमत्कार होतायत त्यांचा लोकांच्या भल्यासाठी उपयोग होत असेल तर त्यांचा जयजयकार करू. त्यांना नमस्कार करू. नाहीतर हे चमत्कार नसून धुळफेक म्हणावं लागेल. त्यापलिकडे काहीच नाही. 

जर कोणाकडे अलौकिक शक्ती आली असेल आणि जादुगाराची छडी फिरवून ते काही करू शकत असतील तर त्यांनी ते करावं, आम्ही तर अशा चमत्कारांना मानत नाही, असंही ते म्हणाले.  
 
ते म्हणाले, “असा कोणी चमत्कारी पुरुष असेल तर त्यानं धर्मांतर रोखावं. लोकांच्या आत्महत्या थांबवाव्यात. लोकांच्या घरात भांडणं होत आहेत, वाद होत आहेत ते मिटवावेत. सगळा देश एकत्र येऊन एकमेकांवर प्रेम करू लागेल असं करा. द्वेष थांबवावा. लोकांसाठी, राष्ट्रासाठी उपयोगी असा चमत्कार करुन दाखवावा, म्हणजे आम्ही त्यांना चमत्कारी पुरुष म्हणू शकू.” 
 
Published By- Priya Dixit