शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (13:25 IST)

चंदीगड विद्यापीठ : बाथरूममधील व्हायरल व्हीडिओप्रकरणी विद्यार्थिनी म्हणतात...

chandigarh
हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींचे आंघोळ करतानाचे व्हीडिओ एका मुलीनेच बनवले आणि मुलाला विकले. चंदीगडजवळ एका खासगी विद्यापीठात हा प्रकार घडल्याचे बीबीसीचे प्रतिनिधी गुरविंदर सिंह ग्रेवाल यांनी सांगितले.
 
विद्यापीठाने मात्र आत्महत्येच्या प्रयत्नाचे वृत्त फेटाळले आहे.
 
विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एका व्हीडिओमध्ये, एका मुलीने हे मान्य केलंय की तिने आपल्या सोबतच्या इतर मुलींचा आंघोळ करत असताना व्हीडिओ बनवला होता.
 
हा व्हीडिओ तिने शिमला येथे राहणाऱ्या एका मुलाला पाठवला असा आरोप या मुलीवर आहे. या मुलाने पुढे तो व्हीडिओ व्हायरल केला.
 
रविवारी (18 सप्टेंबर) पहाटे 3 वाजता पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
दरम्यान, चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचा बाथरूममधला व्हीडिओ लीक होण्याच्या कथित प्रकरणावर विद्यापीठ प्रशासनाने आपलं अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. असा कोणताही आक्षेपार्ह व्हीडिओ बनवले गेल्याचे आरोप विद्यापीठ प्रशासनानं फेटाळून लावले आहेत.
 
विद्यापीठानं म्हटलं आहे की, एका विद्यार्थिनीने पर्सनल व्हीडिओ बनवून आपल्या बॉयफ्रेंडला पाठवला होता, जो आता व्हायरल झाला आहे.
 
चंदीगड विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. आरएस बावा यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, "सात विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची अफवा पसरली आहे. मात्र, कोणत्याही विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्नही केला नाहीये. याच प्रकरणी कोणत्याही मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं नाहीये."
 
त्यांनी म्हटलं, "60 विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह एमएमएस मिळाले आहे, जे पूर्णपणे खोटे आणि बिनबुडाचे आहे. मुलींचे व्हीडिओ शूट केले गेल्याच्या बातम्या निराधार आहेत."
 
नेमकी घटना काय आहे ते थोडक्यात पाहूया
विद्यापीठातील एका मुलीने काही मुलींचे व्हीडिओ बनवले आणि ते व्हायरल केले.
जवळपास 60 विद्यार्थिनींचे व्हीडिओ बनवल्याची माहिती समोर येत आहे.
शनिवारी (17 सप्टेंबर) रात्री उशिरा हे प्रकरण समोर आल्यानंतर रविवारी विद्यापीठात खळबळ उडाली.
पोलिसांनी संबंधित मुलीला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.
शिमला येथील एका मुलाला हे व्हीडिओ पाठवण्यात आले होते, पोलीस या मुलाला अटक करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
 
विद्यार्थिनी म्हणतात...
बीबीसीचे प्रतिनिधी गुरविंदर सिंह ग्रेवाल यांनी या प्रकरणी काही विद्यार्थिनींशीही संवाद साधला.
 
नाव न छापण्याच्या अटीवर काही विद्यार्थिनींनी शनिवारी (17 सप्टेंबर) रात्री उशीरा झालेल्य या सगळ्या प्रकाराबद्दल सांगितलं.
 
त्यांनी सांगितलं की, या घटनेनंतर विद्यापीठामध्ये इंटरनेट बंद आहे. आधी हे हॉस्टेल विद्यार्थ्यांसाठी होतं, नंतर काही दिवसांपूर्वीच ते विद्यार्थिनींसाठी करण्यात आल्याची माहितीही काही जणींनी दिली.
 
या घटनेनंतर काही विद्यार्थिनींना असुरक्षित वाटत आहे आणि विद्यापीठानं या प्रकरणी कठोर कारवाई करावी, असं त्यांचं मत आहे.
 
शनिवारी (17 सप्टेंबर) रात्री हॉस्टेलमध्ये गोंधळ झाला.
 
विद्यार्थिनींनी सांगितलं, "एका मुलीने व्हीडिओ बनवलेला व्हीडिओ व्हायरल झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. या व्हायरल व्हीडिओबद्दल आम्हाला पूर्ण माहिती नाहीये. मात्र 50-60 मुलींचा व्हीडिओ बनवला गेल्याचं सांगितलं जात आहे."
 
विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला का, या वृत्ताची पुष्टि झाली नाहीये. मात्र, काही विद्यार्थिनी घाबरल्यामुळे त्यांना दवाखान्यात घेऊन जावं लागलं. आमच्या समोर विद्यार्थिनींना पाठविण्यात आलं. हा दवाखाना विद्यापीठाच्या आवारातच आहे.
 
एका दुसऱ्या विद्यार्थिनीनं सांगितलं, "शनिवारी संध्याकाळी कळलं की, हॉस्टेलच्या डी ब्लॉकच्या बाथरुममध्ये कॅमेरा लावून मुलींचा व्हीडिओ बनवला गेला आहे. साठ मुलींचा व्हीडिओ बनवला गेल्याचं सांगण्यात आलं."
 
"माझ्या मैत्रिणीही त्याच ब्लॉकमध्ये राहतात आणि या घटनेनंतर त्या खूप घाबरल्या आहेत. त्यांचे आई-वडीलही काळजीत आहेत."
 
"आम्ही अनेकदा सांगितलं होतं की, कॉरिडोरमध्ये कॅमेरे लावण्यात यावेत. मात्र, विद्यापीठ प्रशासनानं याकडे लक्ष दिलं नव्हतं."
 
काय आहे प्रकरण?
'विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीने मुलींचा आंघोळ करतानाचा व्हीडिओ व्हायरल केला,' मीडियाला विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या एका ऑडिओमध्ये म्हटलं आहे.
 
अनेक मुलींचे व्हीडिओ बनवून विद्यापीठ काही कारवाई करत नसल्याचे ती मुलगी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणते.
 
विद्यापीठात विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवला आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घोषणाबाजी करत विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही व्हीडिओ समोर येत आहे.
 
सुरुवातीला विद्यापीठाने हे प्रकरण स्वत:च्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर मग त्यांनी पोलिसांना बोलवलं.
 
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील व्हीडिओ रेकॉर्ड करणाऱ्या मुलीविरोधात खरड पोलीस स्टेशनला एमएमएस तयार करून व्हायरसल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
संबंधित मुलीला पोलिसांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. तसंच या मुलीला अटक करण्याचीही तयारी सुरू आहे.
 
एफआयआर दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. विद्यापीठाने कॅम्पसचे प्रवेशद्वार बंद केले आहेत आणि माध्यमांना आतमध्ये येण्याची परवानगी दिलेली नाही.
 
पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत सिंह बेंस यांनी ट्वीट करत विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. दोषींवर कडक कारवाई होईल असंही ते म्हणाले आहेत.
 
हे प्रकरण संवेदनशील असून महिलांच्या सन्मानाचे प्रकरण आहे. त्यामुळे माध्यमांसह आपल्या सगळ्यांना सावध राहण्याची आवश्यकता आहे.
 
व्हीडिओ कोणी व्हायरल केला?
आणखी एका व्हायरल व्हीडिओमध्ये हॉस्टेलच्या वॉर्डन आरोपी मुलीची चौकशी करत आहेत. यावेळी या मुलीने असं सांगितल्याचं ऐकू येतं की, तिने काही व्हीडिओ बनवून शिमल्यातील एका मुलाला पाठवले होते.
 
वॉर्डनने यावेळी विद्यार्थिनीला विचारलं की तिने असं का केलं? यावर तिने काहीच उत्तर दिलं नाही.
 
महत्त्वाची माहिती
आत्महत्या एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. तुम्ही तणावातून जात असाल तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाईन
 
18002333330 या क्रमांकावर फोन करून मदत मिळवू शकता.
 
मित्र आणि कुटुंबाशीही तुम्ही संवाद साधायला हवा. योग्य वेळी सल्ला घेतल्यास आत्महत्या काही प्रमाणात रोखल्या जाऊ शकतात.
 
मानसिक समस्यांवर औषधं आणि थेरपी करून उपचार शक्य आहे. यासाठी तुम्ही मानसोपचारत्ज्ञांची मदत घेतली पाहिजे.
 
तुम्ही या हेल्पलाईनवरही संपर्क साधू शकता-
सामाजिक न्याय मंत्रालय - 1800-599-0019 (13 भाषेत उपलब्ध)
 
इन्स्टीट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाईड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
 
हितगूज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
 
नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स -080 - 26995000