तेलंगणातील मुलुगुला भूकंपाचे धक्के, लोकांमध्ये घबराट
Telangana News : तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 एवढी होती. भूकंपानंतर किती नुकसान झाले हे अजून स्पष्ट झालेले नाही. सकाळी 7.27 च्या सुमारास या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 7.27 वाजता भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून 40 किलोमीटर खाली होते. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली आणि लोक घराबाहेर पडले. कोणतीही जीवितहानी किंवा मोठी हानी झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. अधिकारी परिस्थितीचा अंदाज घेत आहे. त्याचवेळी छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर भागातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दंतेवाडा, सुकमा आणि विजापूर जिल्ह्यात लोकांना अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दक्षिण बस्तरमध्ये पहिल्यांदाच भूकंपाचे असे धक्के जाणवले, ज्यामुळे लोकांमध्ये आणखीनच भीती आणि दहशत पसरली.
छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आणि लोक घराबाहेर पळू लागले. स्थानिक लोकांनी सांगितले की, ही घटना त्यांच्यासाठी खूप विचित्र आहे, कारण याआधी येथे भूकंपाचे असे धक्के कधीच आले नव्हते. भूकंपानंतर प्रशासनाने तात्काळ मदत आणि बचाव कार्यासाठी कर्मचाऱ्यांना सतर्क केले. पण अजून कोणतेही मोठे नुकसान झाल्याची बातमी नाही.