बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 22 जून 2020 (07:56 IST)

भारतीय सैन्यदलाला चीनविरुद्ध कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सीडीएस जनरल बिपीन रावत आणि तिन्ही सेना प्रमुखांशी उच्चस्तरीय बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षणमंत्र्यांनी आढावा बैठकीत वास्तविक नियंत्रण रेषेवरील चिनी सैन्याच्या कोणत्याही प्रकारच्या आक्रमक वृत्तीला उत्तर देण्यासाठी सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. आतापासून भारत सीमेचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या धोरणात्मक पद्धतींचा अवलंब करेल. पूर्वेकडील लडाख व इतर क्षेत्रातील चीनच्या कोणत्याही हल्ल्याचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.
 
हवाई दलाच्या जवानांच्या सुट्या रद्द
सूत्रांच्या माहितीनुसार, हवाई दलाच्या जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. एअर चीफ मार्शल आर.के.एस भदोरिया यांनी कालच म्हटले होते, की ते कोणत्याही कारवाईसाठी तयार आहेत. 15 जून रोजी गलवान खोर्‍यात भारताचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी. व्ही. संतोष बाबू शहीद झाल्यानंतर भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना चांगलाच धडा शिकवला. भारतीय सैनिकांनी गलवान खोर्‍यात चीनच्या बर्बरतेचा बदला घेतला. भारतीय सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात अनेक चिनी सैनिकांचे मणके मोडले गेले. सूत्रांच्या माहितीनुसार भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सुमारे 2 ते 4 तास चकमक सुरू होती. इतकेच नाही तर भारतीय सैन्याने गलवान खोर्‍यात चीनचा अतिआत्मविश्‍वास देखील मोडला. भारतीय जवानांनी दिलेले उत्तर चीन कधीच विसरणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी माहिती मिळाली आहे, की गलवान खोर्‍यात एक चिनी कर्नल भारतीय सैन्याने जिवंत पकडला होता.
 
पूर्व लडाखमधील चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणाव अद्याप कमी झालेला नसून चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात तणाव असल्या कारणाने भारत यापुढे चीनपासून नियंत्रण रेषेचे रक्षण करण्यासाठी वेगळी रणनीती आखणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिले आहे.
 
बिपीन रावत यांच्यासहित तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची रविवारी भेट घेतली. राजनाथ सिंग सोमवारी रशिया दौर्‍यासाठी जाणार असून त्यापूर्वी ही भेट घेण्यात आली आहे. यावेळी राजनाथ सिंग यांना लडाखमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी सर्व प्रमुखांना नियंत्रण रेषेजवळ हवाई तसेच समुद्र मार्गावर चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पूर्व लडाख किंवा इतर ठिकाणी चीनने गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.
 
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गलवान खोर्‍यात 15 जूनच्या रात्री चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर या भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. समोरासमोर उभ्या ठाकलेल्या उभय बाजूच्या सैनिकांमध्ये कोणत्याही क्षणी ठिणगी पडून या भागातील स्थिती आणखी खालावण्याची शक्यता आहे.