रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (10:06 IST)

विदर्भात उष्णतेची लाट, तमिळनाडूमध्ये चक्रीवादळ धडकणार

महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे. याची सर्वाधिक झळ विदर्भाला बसली असून अकोल्यात तापमान 46.3 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमान वाढले आहे.
 
दरम्यान, राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे 46.3 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. कोरड्या हवामानामुळे राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत कमाल तापमानाने चाळीशी गाठली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांमध्येही उष्णतेचा दाह वाढत असून, मध्य महाराष्ट्रात मालेगाव येथे 42.8 तर मराठवाड्यात परभणी येथे 44.1 अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदले गेले. कोकणात मात्र, कमाल तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. 
 
नागपूर येथे 44.3 अंश, परभणी 45, चंद्रपूर 45.4, यवतमाळ 44.5, बुलढाणा 42.5, अमरावती 40.5, जळगाव 43 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवण्यात आले.
 
उत्तर, मध्य भारतात उष्णतेच्या लाटेची स्थिती असताना दक्षिण भारतावर मात्र वर्षातील पहिल्या चक्रीवादळाचे सावट आहे. विषुववृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात द्रोणीय स्थिती तयार झाली असून, गुरुवारी तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत त्याची तीव्रता चक्रीवादळापर्यंत वाढून ३० एप्रिल रोजी वर्षातील पहिले चक्रीवादळ तमिळनाडू आणि श्रीलंकेदरम्यानच्या भागाला धडकण्याची शक्यता आहे.