मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जुलै 2022 (11:58 IST)

सिद्धू मुसेवालावर 'पहिली गोळी झाडणाऱ्या' मन्नूचे एन्काउंटर

अमृतसर जवळच्या अटारीमधील भाकना कलान गावाजवळ दोन संशयित गँगस्टर्सचा एन्काउंटर केल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केल्यानंतर पुन्हा एकदा सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली.
 
पंजाबचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रमोद बान यांनी एन्काउंटरमध्ये दोन संशयित गँगस्टर मारले गेल्याचं म्हटलं आहे. या चकमकीत तीन पोलीस अधिकारीही जखमी झाल्याची माहिती दिली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांची नावं जगरुप रुपा आणि मन्नू कुसा आहेत. पंजाबी पॉप गायक सिद्ध मुसेवाला हत्येप्रकरणी पोलीस त्यांच्या शोझात होते.
 
मन्नू कुसाचा एनकाउंटर कसं झालं?
मन्नू आणि जगरूप हे भारत पाकिस्तान सीमेवरील भाकना या गावात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला. पोलिसांच्या मते या दोघांनाही अंमली पदार्थांचे व्यसन होते.
 
त्यामुळे ते अशाच भागात थांबतील जिथे त्यांना हे पदार्थ लवकर उपलब्ध होतील, असा अंदाज पोलिसांनी बांधला होता.
 
पोलिसांनी स्थानिकांना आधी सूचना देऊन ठेवल्या होत्या की पोलिसांचे ऑपरेशन संपेपर्यंत घराबाहेर कुणीही पडू नये.
 
पोलिसांनी त्या इमारतीला चारही बाजूंनी घेरले. बुलेटप्रुफ वाहनांच्या ताफ्यात आलेल्या पोलिसांच्या शरीरावर बुलेटप्रुफ जॅकेट होते.
 
पोलिसांनी आधी त्यांना शरणागती पत्करण्याची सूचना दिली पण नंतर त्यांच्याकडून गोळीबार सुरू करण्यात आला, असं पोलिसांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
 
पोलिसांनी चहूबाजूंनी गोळीबार सुरू केला. मन्नू आणि जगरूपकडे एक-47 होती. ही चकमक तीन-चार तास चालली.
 
या चकमकीत दोन पोलीस आणि एक कॅमेरामन जखमी झाल्याची माहिती अतिरिक्त महासंचालक प्रमोद बान यांनी दिली.
 
पंजाबमधून संघटित गुन्हेगारीचे उच्चाटन केले जाईल अशी माहिती काल बान यांनी पत्रकार परिषदेत दिली. एक तर शरणागती पत्कराअन्यथा कायद्यानुसार कारवाई होईल, असं बान म्हणाले.
 
बीबीसी पंजाबीचे सहकारी पत्रकार सुरिंदर होन हे कुसा या ठिकाणी जाऊन आले आणि तिथे त्यांनी मन्नू कुसाच्या गावातले वातावरण कसे आहे हे प्रत्यक्ष अनुभवले.
 
मनप्रीत 'मन्नू' हा मोगा जिल्ह्यातल्या कुसाचा रहिवासी आहे. गावाच्या नावावरुनच मनप्रीतचं नाव मन्नू कुसा असं पडलं. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर मन्नू हा चर्चेत आला होता.
 
मन्नू आणि त्याचे कुटुंब
मन्नूचे कुटुंब कुसा या ठिकाणी राहते. मन्नू हा सुतारकाम करून आपला उदरनिर्वाह करत होता. पण एका गुन्ह्यात त्याचं नाव आलं आणि नंतर तो गुन्हेगारीकडेच वळला.
 
सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात जेव्हा जगप्रीत आणि मन्नूचे नाव समोर आले, तेव्हा आम्हाला धक्का बसला असं गावकरी सांगतात.
 
मन्नूबाबत बोलण्यास गावकऱ्यांनी नकार दिला. पण गावातील एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी पंजाबीला माहिती दिली, "मन्नूच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर मन्नूच्या कुटुंबीयांनी आपल्या घराला कुलूप ठोकले आहे आणि ते अज्ञातस्थळी गेले अशी माहिती त्यांनी दिली."
 
मन्नूचा भाऊ सुतारकाम करत असे. त्याने त्याच्यासोबतच या कामाला सुरुवात केली. जेव्हा गावकऱ्यांनी ऐकलं की मन्नू हा शार्प शूटर बनला आहे. तेव्हा ते म्हणाले की याआधी आमच्या गावातील कुणी हे काम नव्हतं केलं.
 
मन्नूवर आतापर्यंत एकूण 14 केसेस असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
या 14 पैकी 5 केसेस या बदनी कलान पोलीस स्टेशनमध्येच नोंदवलेल्या आहेत. कुसा हे गाव याच पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येतं.
 
गावत झालेल्या भांडणातून हत्या केल्याचा आरोप मन्नूवर होता. तो तुरुंगात असताना त्याच्या मोठ्या मोठ्या गुंडांशी ओळखी झाल्याचं पोलीस सांगतात.
 
तुरुंगातून सुटून परत आल्यावर आणखी एका हत्या प्रकरणात कुस्साचे आणि त्याचा भाऊ गुरदीप सिंग यांचे नाव आले होते.
 
मन्नू कुसा आणि जगरूप रूपाचा यांचा एनकाउंटर झाल्यानंतर स्थानिक पोलीस देखील दोघांवर बोलायचे टाळत आहेत.
 
दिल्ली पोलीस-पंजाब पोलिसांनी केलेल्या तपासात अशी गोष्ट समोर आली आहे की सिद्धू मुसेवालावर पहिली गोळी मन्नू कुसानेच झाडली होती, असं पोलिसांनी सांगितले.
 
सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर मन्नूचे कुटुंबीय कुठे आहेत
सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर मन्नूच्या घरी नोटीस लावण्यात आली होती. तेव्हापासून मन्नूच्या कुटुंबीयांनी गावातले घर सोडल्याचे गावकरी सांगतात.
 
मन्नूचे नाव मुसेवाला प्रकरणात आले असले तरी गावकरी सांगतात की त्याचे कुटुंबीय मात्र सर्वांशी सौजन्याने वागत.
 
पण त्यांचे आणि दुसऱ्या गटाचे भांडण झाले तेव्हा मन्नू हा गुन्हेगारीकडे वळला. असं बुटा सिंग नावाच्या एका गावकऱ्याने सांगितलं.
 
त्याचे कुटुंबीय आता कुठे आहेत माहित नाही पण घरांच्या सर्व गेटवर पोलिसांच्या नोटिशी लावण्यात आल्याचं गावकरी सांगतात.
 
मन्नू कुसा हा गोल्डी ब्रारचा निकटचा सहकारी होता. गोल्डी ब्रार हा सध्या कॅनडात आहे. गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई हे सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आरोपी आहेत.
 
गावकऱ्यांना एक गोष्ट मात्र सतावत आहे ती म्हणजे आधी सुतारकाम करणारा मुलगा पुढे गॅंगस्टर कसा बनला आणि त्याला मोठे-मोठे शस्त्र चालवायचं ट्रेनिंग नेमकं कुणी दिली.
 
अंत्यसंस्कार कोण करणार
'कदाचित तो गुन्हेगार असेल पण तो आमच्या गावचा आहे,' असं गावकरी मन्नूबद्दल हळहळत म्हणतात.
 
एका व्यक्तीने चिंता व्यक्त केली की आता मनप्रीतवर अंत्यसंस्कार कोण करणार? मन्नूचा भाऊ गुरदीप हा तुरुंगात आहे. त्याचे कुटुंबीय अज्ञात स्थळी आहेत.
 
जेव्हा त्याचा मृतदेह गावात येईल त्यावर कोण अंत्यसंस्कार करणार, त्याच्या अंत्यसंस्कारावेळी त्याच्या कुटुंबातील कुणी हजर राहू शकेल की नाही यावर गावकरी बोलत आहेत.