शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑगस्ट 2023 (08:50 IST)

नरेंद्र मोदीः चंद्रयान-3 जिथे उतरले त्या जागेला ‘शिवशक्ती’ नाव

चंद्रयान-3 हे चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं, त्या ठिकाणाला 'शिवशक्ती' हे नाव देण्यात यावं, तर 2019 साली चंद्रयान-2 हे ज्या ठिकाणी कोसळलं ते ठिकाण यापुढे 'तिरंगा पॉईंट' म्हणून संबोधण्यात यावं, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
 
परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आज (26 ऑगस्ट) सर्वप्रथम इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. बंगळुरू येथील इस्रोच्या कार्यालयात इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांची भेट घेतल्यानंतर मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांशी संवाद साधला.
 
यावेळी नरेंद्र मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. तसेच या मोहिमेच्या माध्यमातून भारताचं नावलौकिक वाढवल्याबद्दल सर्वांचे आभारही मानले.
 
आपल्या भाषणात मोदी म्हणाले, “तुम्हाला भेटून मला एका वेगळ्याच आनंदाची अनुभूति होत आहे. व्यक्तीच्या जीवनात अनेक अशा घटना घडतात. ज्यावेळी उत्सुकता अत्यंत शिगेला पोहोचलेली असते. यावेळी माझ्यासोबतही तसंच झालं.”
“मी दक्षिण आफ्रिकेत होतो, नंतर ग्रीसला कार्यक्रम होता. पण माझं मन फक्त तुमच्यासोबतच होतं. पण कधी कधी मला वाटतं, मी तुमच्यासोबत अन्याय करतो की काय. उत्सुकता माझी आणि त्यामुळे तुम्हाला त्रास देतो. इतक्या सकाळी सकाळी तुम्हाला इथे बोलावलं,” असं त्यांनी म्हटलं.
 
दरम्यान, हे बोलत असताना नरेंद्र मोदी काहीसे भावुक झाल्याचं दिसून आलं. त्यांचा आवाज खोल झाला आणि डोळ्यात अश्रूही दिसले.
पुढे मोदी म्हणाले, “भारतात येताच लवकरात लवकर मला तुमचे दर्शन घ्यायचे होते. तुम्हा सर्वांना सॅल्यूट करायचं होतं. तुमची मेहनत, धैर्य, चिकाटी आणि इच्छाशक्ती या सगळ्यांना माझं सॅल्यूट आहे. देशाला तुम्ही इतक्या उंचीवर घेऊन गेलात, हे काही साधारण यश नाही. हा अंतराळात घुमत असलेला भारताच्या सामर्थ्याचा शंखनाद आहे.
 
‘इंडिया इज ऑन द मून’, आपण तिथे पोहोचले, जिथे आजवर कुणीच पोहोचू शकलं नव्हतं. जे कुणीच कधी केलेलं नव्हतं, आपण ते करून दाखवलं आहे. हा नवा भारत आहे. नवा भारत जो काही विचार करतो, नव्या पद्धतीने करतो. अंधकारात प्रकाशाचे किरण सोडण्याची धमक भारतात आहे. एकविसाव्या शतकात हाच भारत जगभरातील समस्यांवर तोडगा शोधेल.
 
माझ्या डोळ्यात 23 ऑगस्टचा तो क्षण वारंवार उभा राहतो. ज्यावेळी लँडर चंद्रावर उतरलं, तेव्हा इस्रोच नव्हे तर संपूर्ण देशभरात लोक उत्साहाने भारावून गेले, तो क्षण कोण विसरू शकतो.”
 














Published By- Priya Dixit