या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे – नवाब मलिक
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा जाहीर
आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने आजपासून देशभरातील शेतकऱ्यांनी जनआंदोलनाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात शेतकऱ्यांनी बंद पुकारला आहे. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा असल्याचे पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी जाहीर केले आहे. बंदला पाठिंबा जाहीर करताना मलिक म्हणाले की या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. आपली भूमिका स्पष्ट करताना मलिक पुढे म्हणाले की या सरकारच्या काळात वर्षभरापूर्वी देशातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा संप पुकारला होता. शेतकऱ्यांनी त्यावेळी मोठी आक्रमक भूमिका घेतली होती. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे सरकारला झुकावे लागले होते. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचेही आश्वासन त्यावेळी केले होते. मात्र एका वर्षानंतर पुन्हा शेतकऱ्यांना त्याच मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे याला सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे असा टोला मलिक यांनी सरकारला लगावला. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढावा व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.