1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (11:49 IST)

वॉशिंग मशीन उघडताच आतमध्ये सव्वा कोटी रुपये सापडले

cash notes
आंध्र प्रदेशात एका ट्रकमध्ये काही मालाची वाहतूक केली जात होती. त्या ट्रकमध्ये वॉशिंग मशीनही भरण्यात आली होती. दरम्यान एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मार्गावरील वाहनांची तपासणी सुरू केली. यात ट्रकमध्ये भरलेल्या वॉशिंग मशिनमधून 1 कोटी 30 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. यासोबत अनेक मोबाईलही सापडले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विशाखापट्टणमहून विजयवाडाकडे जात असताना वाहनांची तपासणी सुरू केली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही तपासणी सुरू केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना वाटेत एक मिनी मालवाहू ट्रक दिसला. त्याला थांबवून शोध घेतला. ट्रकमधील दोन वॉशिंग मशिन उघडून पोलिसांनाही आश्चर्य वाटले. पोलिसांना मिळालेली माहिती ठोस होती, कारण वॉशिंग मशीनमध्ये 1.3 कोटी रुपयांची रोकड होती. हा ट्रक विद्युत उपकरणांच्या शोरूमकडे जात होता.
 
विजयवाडा येथे जाणाऱ्या मिनी-कार्गो ट्रकमधून रोख रक्कमेसह सहा वॉशिंग मशीन आणि 30 सेलफोन जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कुरिअर सेवेत काम करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. गजुवाका डीसीपी के आनंद रेड्डी यांनी जप्त केलेल्या रोख रकमेबाबत सांगितले की, कंपनी ही रोकड विशाखापट्टणम आणि जवळील श्रीकाकुलम आणि विजयनगरम येथून बँकेत जमा करण्यासाठी पाठवत होती.
 
मात्र ही रोकड गुपचूप का घेतली जात आहे, अशी विचारणा पोलिसांनी केली. कोणतेही स्पष्ट कारण किंवा त्यासंबंधीची कोणतीही कागदपत्रे सापडली नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि रोख स्थानिक न्यायालयात सुपूर्द केली. याशिवाय पोलिसांनी आयकर विभाग आणि जीएसटी अधिकार्‍यांना रोख वसुलीची माहिती दिली आहे.