मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (14:16 IST)

किनारपट्टीवरील जिल्ह्यांत यासचा प्रकोप

यास चक्रीवादळाचा जोरदार प्रकोप भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये सुरू असल्याचं दिसून येतं.
 
ओडिशाच्या भद्रक, जगतसिंहपूर, कटक, बालासोर, ढेंकानाल, जयपूर, मयुरभंज, केंद्रापडा, क्योंझर इथे पावसाने झोडपण्यास सुरुवात झाली. तर पश्चिम बंगालमधल्या दिघा, दक्षिण 24 परगण्यात बांकुरा, झारग्राम तसंच मेदिनीपूर इथे सकाळपासूनच आभाळ दाटून आलं होतं. त्यानंतर या परिसरात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
 
यास चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगालमधील दिघा तर ओडिशामधील भद्रक जिल्ह्याला बसल्याचं दिसून येत आहे.
 
इथं अनेक नागरिकांना आपली राहती घरं सोडून इतरत्र सुरक्षित स्थळी हलवण्याचं कार्य बचावपथकांमार्फत सुरू आहे.
 
या परिसरात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साठल्याने अनेक अडचणी येत आहेत. खबरदारी म्हणून परिसरातील वीज बंद करण्यात आली आहे.
 
NDRF कडून खबरदारी
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पारादीप बंदरात खबरदारीचे उपाय हाती घेण्यात आले आहेत.
 
या भागात जेवढी जहाजं होती त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लोकांसाठी निवारा शेड उभारली जात आहे. यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध असतील.
 
ओडिशामधील एनडीआरएफचे महासंचालक एस.एन.प्रधान यांनी सांगितलं की चक्रीवादळ लक्षात घेऊन पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
 
ओडिशात 52 तर बंगालमध्ये 45 चमू तैनात करण्यात आले आहेत.
 
बंगालमध्ये 11.5 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
 
पाऊण लाख नागरिकांकरता मदत आणि बचाव कार्य सुसज्ज ठेवण्यात आलं आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे.
 
जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे पश्चिम बंगालमधल्या हुबळी आणि उत्तर 24 जिल्ह्यात 80 घरांचं नुकसान झालं आहे तर वीज पडून दोनजणांचा मृत्यू झाला आहे.
 
दळणवळणावर परिणाम
यास चक्रीवादळाचा मोठा फटका दळणवळण व्यवस्थेवर झाला आहे. खबरदारी म्हणून ओडिशाकडे जाणारी वाहतूक एकतर वळवण्यात आली किंवा रद्द तरी करण्यात आली आहे.
 
येथे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती पूर्व रेल्वेचे महासंचालक मनोज जोशी यांनी दिली.
 
रेल्वेमार्फत विविध ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत होता. तो यापूर्वीच करण्यात आला आहे. वादळामुळे रेल्वेचं इलेक्ट्रिक वायरिंग तुटून वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतुकीसाठी डिझेल इंजीन सज्ज करण्यात आले आहेत, असंही जोसी यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
 
त्याचप्रमाणे, विमान वाहतुकीला यास चक्रीवादळामुळे मोठा फटका बसला. मुंबईहून भुवनेश्वरकडे जाणाऱ्या 6 प्रवासी विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.