बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (09:38 IST)

कम्युनिकेशन गॅप होती ती आता दूर करण्यात आली, पतांजलीची माहिती

योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने करोनाऔषधाची जाहिरात करण्यास मनाई करण्यात आली. ‘आयुष’ने पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील मागितला असून, जोवर त्याची पडताळणी होत नाही, तोवर ही बंदी कायम राहणार आहे. यावर पतंजलीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कम्युनिकेशन गॅप होती ती आता दूर करण्यात आल्याची प्रतिक्रिया पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली.
 
“हे सरकार आयुर्वेदाला चालना देणारे आहे. जी आमच्यात कम्युनिकेशन गॅप होती ती आता दूर झाली आहे. रँडमाइझ्ड प्लेसबो कंट्रोल्ड क्लिनिकल ट्रायल्सचे जे काही मापदंड आहेत ते १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे,”अशी माहिती पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात एक ट्विटही केलं आहे.
 
रामदेवबाबा यांनी हरिद्वारमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘कोरोनील’आणि ‘श्वसरी’औषधांची करोनाबाधित रुग्णांवर चाचणी करण्यात आल्याचं आणि ही औषधे १०० टक्के परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा केला. या औषधांमुळे केवळ सात दिवसांत करोना पूर्णपणे बरा होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या औषधाची परिणामकारकता तपासण्यासाठी पतंजलीने किती नमुन्यांची तपासणी केली, हे वैद्यकीय प्रयोग कोणत्या ठिकाणी झाले, कोणत्या रुग्णालयांत हे संशोधन झाले, त्यासाठी संस्थात्मक तत्त्व समितीने परवानगी दिली होती काय, याचा तपशील पतंजलीकडे मागण्यात आला आहे, असं आयुषतर्फे सांगण्यात होतं.
 
हरिद्वारमध्ये पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले की, पतंजलीचे करोना संच ५४५ रुपयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या करोना संचामध्ये ३० दिवस पुरेल इतके औषध असेल. करोनाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी म्हणूनही या संचाचा वापर करता येऊ शकतो, असा दावाही पतंजलीने केला आहे. हरिद्वारस्थित दिव्या फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लि. यांनी औषधांचे उत्पादन केले आहे. पतंजली संशोधन संस्था आणि जयपूरस्थित राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान संस्था यांच्या संयुक्त संशोधनातून औषध तयार करण्यात आलं आहे, असं रामदेवबाबा यांनी सांगितले.