बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (14:54 IST)

हैदराबाद मनपा निवडणुकीत मोदी-शाह पूर्ण ताकद पणाला का लावत आहेत?

सरोज सिंह
हैदराबादमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आपली पूर्ण शक्ती पणाला लावल्याचं चित्र दिसून येत आहे.
 
तेलंगणात भारतीय जनता पक्षाकडे 119 पैकी फक्त दोन आमदार आहेत. तर, लोकसभेच्या 17 जागांपैकी फक्त 4 खासदार भाजपचे आहेत. तरी देखील हैदराबाद महानगर पालिकेसाठी भाजपने पूर्ण शक्ती पणाला लावल्याचं दिसत आहे.
 
हैदराबाद महापालिकाचं वार्षिक बजेट साडे पाच हजार कोटी रूपयांचं आहे. या शहराची लोकसंख्या जवळपास 82 लाखांवर आहे.
 
देशभरात सद्यस्थितीत हैदराबाद निवडणुकीची चर्चा होत आहेत.
 
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हैदराबादमध्ये रोड-शो केला. तर, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर यांच्यासारखे केंद्रीय मंत्री हैदराबादमध्ये प्रचारासाठी गेले होते. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार तेजस्वी सूर्या गेल्या आठवडाभरापासून हैदराबादमध्ये डेरेदाखल झाले आहेत.
 
बिहारमध्ये भाजपच्या विजयाचे शिल्पकार, वरिष्ठ नेते भूपेंद्र यादव यांच्यावर पक्षाने या निवडणुकांची जबाबदारी सोपवली आहे.
 
त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, तेलंगणा राज्यातील एका शहराच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप आपलं सर्वस्व पणाला का लावत आहे?
 
हैदराबाद महापालिका निवडणुका
हैदराबादमध्ये निवडणुका 1 डिसेंबरला म्हणजे आज होणार आहेत आणि निवडणुकीचे निकाल 4 डिसेंबरला लागणार आहेत. महापालिकेत एकूण 150 जागा आहेत.
 
या आधी झालेल्या महापालिका निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) ला 99 जागा मिळाल्या होत्या. असदुद्दीन औवैसी यांच्या एमआयएमला 44, तर भाजपच्या पदरात फक्त 4 जागा पडल्या होत्या.
सामान्यत: महापालिका निवडणूक ही स्थानिक मुद्यांवर लढली जाते. वीज, पाणी, रस्ते आणि कचरा हे पालिका निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असतात. राज्य किंवा केंद्रीय स्तरावरील मोठे नेते पालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरल्यास, ही मोठी गोष्ट मानली जाते.
 
प्रादेशिक पक्षांचे अध्यक्ष प्रचारात उतरल्यास आपण समजू शकतो. पण, एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे नेते प्रचारात उतरल्यास, लक्षात येतं की या निवडणुकीत त्या पक्षाचं सर्वस्व पणाला लागलं आहे.
 
दुब्बाक सीटवर पोटनिवडणूक
भाजपसाठी ही निवडणूक का महत्त्वाची आहे?
 
हैदराबादमध्ये राहणारे ज्येष्ठ पत्रकार दिनेश आकुला सांगतात, "नोव्हेंबरच्या सुरुवातीला दुब्बाकमध्ये पोटनिवडणूक झाली. या जागेवर टीआरएसचा आमदार होता. आमदाराच्या मृत्यूनंतर ही जागा रिक्त झाली. पक्षाने आमदाराच्या पत्नीला निवडणुकीचं तिकीट दिलं."
 
"ही जागा यासाठी महत्त्वाची होती कारण, राज्याचे मुख्यमंत्री टी चंद्रशेखर राव, ज्या जागेवर जिंकून येतात. ही विधानसभा सीट त्यांच्या बाजूची आहे. हा परिसर टी चंद्रशेखर राव यांचा बालेकिल्ला मानला जातो. या निवडणुकीची जबाबदारी टी चंद्रशेखर राव यांचा पुतण्या हरीश राव यांच्या खांद्यावर होती. टीआरएसमध्ये हरीश राव यांची ओळख निवडणूक जिंकणारे शिल्पकार म्हणून आहे. मात्र, खूप प्रयत्न करूनही टीआरएसला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. भाजपचा आमदार या ठिकाणी निवडून आला," आकुला सांगतात.
 
या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.
 
आकड्यांवर नजर टाकली तर दिसून येतं की, दुब्बाक पोटनिवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी 13.75 वरून 38.5 पर्यंत जाऊन पोहोचली.
 
दिनेश आकुला यांच्या सांगण्यानुसार, या निवडणुकीतील भाजपची रणनीती जाणून घेण्यासाठी आपल्याला टीआरएस आणि एमआयएमचं राजकारण समजून घ्यावं लागेल.
"गेल्यावेळच्या हैदराबाद महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे पुत्र केटी रामा राव यांनी निवडणुकीची रणनीती तयार केली होती. के. चंद्रशेखर राव आपल्या मुलाला राज्याची सत्ता सांभाळण्यासाठी तयार करत होते. मात्र पक्षात चंद्रशेखर राव यांच्या मुलापेक्षा हरीश राव यांचं वर्चस्व जास्त होतं," आकुला सांगतात.
 
"हरीश राव यांना पक्षात एकटं पाडण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी ही खेळी केली. ज्याचा त्यांना फायदा झाला. केटी रामा राव यांच्या नेतृत्वात टीआरएसने हैदराबाद निवडणुकीत 99 जागांवर विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा टीआरएसला चांगलं यश मिळालं तर, पक्षावर त्यांची पकड पक्की होईल. केटी राव सद्यस्थितीत राज्यात नगरविकास मंत्री आहेत. पोटनिवडणुकीत पराभवाचा सामाना करावा लागल्यामुळे, हरीश राव पक्षात कमकुवत झाले आहेत," असं आकुला यांचं निरीक्षण आहे.
 
भाजप टीआरएसमधील या अंतर्गत कलहाचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहे.
 
भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची का आहे?
साल 2017 मध्ये भाजपचे अध्यक्ष असताना अमित शाह यांनी पक्षाला ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत नेण्याचं लक्ष ठेवलं होतं. भाजपच्या नेत्यांकडून हेच लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
दुसरीकडे, टीआरएसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहामुळे राज्यावर असलेली त्यांची पकड थोडी कमकुवत झाली आहे. टीआरएसला धक्का देण्याची ही चांगली वेळ असल्याचं भाजप नेत्यांचं मत आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील शहरी भागात दोन वेळा पाणी साचलं होतं. हैदराबादच्या नागरिकांना दोन वेळा पावसाचं पाणी भरल्याने त्रास सहन करावा लागला. यामुळे टीआरएसला स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
तिसरी गोष्ट म्हणजे, कॉंग्रेसने पूर्ण जोर लावल्यानंतरही त्यांना दुब्बाक सीटवर तिसऱ्या क्रमांकावरच समाधान मानावं लागलं. भाजप नेत्यांना ही वेळ राज्यात कॉंग्रेसची जागा घेण्यासाठी योग्य असल्याचं मत आहे. तर, ओवैसींच्या एमआयएमवर भाजपची 'बी' टीम असल्याचा नेहमीच आरोप होतो. भाजप ही गोष्ट खरी नसल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
 
हैदराबाद महापालिकेचं बजेटही भाजपचं या शहरात स्वारस्य का आहे, हे दाखवून देतं. हैदराबाद महापालिकेच बजेट साडे पाच हजार कोटी रूपयांचं आहे. राज्याच्या सत्तेची चावी हैदराबाद आहे, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
 
निवडणुकीत ध्रुवीकरणाचं राजकारण
राज्याच्या राजकारणाची माहिती असलेले राजकीय विश्लेषक जिनका नागराजू म्हणतात, "भाजपच्या नवीन रणनीतीमागे राज्याचे नवीन अध्यक्ष आहेत."
 
ते म्हणतात, "पहिल्यांदाच भाजपने हैदराबादचे रहिवासी नसलेल्या व्यक्तीला राज्याचा अध्यक्ष बनवलं. तेलंगणाचे अध्यक्ष बंदी संजय कुमार, करीमनगर लोकसभेचे खासदार आहेत. दुब्बाक सीटवर भाजपला मिळालेल्या विजयाच श्रेय्य संजय कुमार यांनाच जातं."
 
भाजपला विश्वास आहे की, दुब्बाक पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यास फायदेशीर ठरलेली बंदी संजय कुमार यांची रणनीती हैदराबाद निवडणुकीतही नक्कीच यश देईल.
नागराजू म्हणतात, "भाजपने याआधी राज्यात टीआरएसवर सरळ हल्ला केला नाही. राज्यातील लोकांमध्ये एक चर्चा आहे की, टीआरएस आणि औवैसी यांच्यात अंतर्गत युती आहे. दोन्ही पक्ष याबद्दल जाहीर वक्तव्य करत नाहीत."
 
बंदी संजय कुमार यांनी राज्याचे अध्यक्ष झाल्यानंतर हीच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांची रणनीती पक्षासाठी फायदेशीर ठरली.
 
ते पुढे सांगतात, "भाजपचे नेते प्रचार करतात, टीआरएसला मत देणं म्हणजे ओवैसींना मतदान करणं. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी काही दिवसांपूर्वीच रोहिंग्या मुसलमानांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईकचं वक्तव्य केलं. स्मृती इराणींनी याबद्दल वक्तव्य केलं होतं. भाजप निवडणुकीत ध्रुवीकरणाचं राजकारण करत असताना, इतर पक्षांना याबाबत खुलासा करावा लागत आहे."
प्रचार करताना तेजस्वी सूर्या म्हणाले होते, "असदुद्दीन ओवैसी आणि अकबरउद्दीन ओवैसी यांनी विकासाची भाषा करणं हे हास्यास्पद आहे. त्यांना जुन्या हैदराबादमध्ये फक्त रोहिंग्या मुसलमानांचा विकास करण्याचं काम केलं. ओवैसींना मत म्हणजे भारताविरोधात मत."
 
याचं उत्तर देताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "सिकंदराबादचे भाजप खासदार जी किशन रेड्डी, केंद्रात गृहराज्यमंत्री आहेत. जर रोहिंग्या आणि पाकिस्तानी मुसलमान इथे रहातात, तर मग ते काय करतात?"
 
जिनका नागराजू यांच्या सांगण्यानुसार, "याआधी निवडणुकीत फक्त वीज, पाणी आणि रस्ते हे मुद्दे उपस्थित केले जायचे. मात्र यंदा पहिल्यांदा मुसलमान, सर्जिकल स्ट्राईक, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्याबाबत चर्चा होत आहे."
 
हैदराबादमध्ये 40 टक्के मुसलमान राहतात. एमआयएम खासदार असदुद्दीन औवैसी हैदराबादमधूनच खासदार आहेत.
 
जिंकण्याचा विश्वास
तेलंगणात 2018 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. 119 आमदारांच्या विधानसभेत 88 जागा टीआरएसला मिळाल्या. कॉंग्रेसला 19 जागा, एमआयएसचे सात तर भाजपचा फक्त 1 आमदार आहे.
मात्र, सहा महिन्यांनंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे चार खासदार निवडून आले. टीआरएसकडे 9, कॉंग्रेसकडे तीन तर एमआयएमचा एक खासदार आहे.
 
नागराजू पुढे सांगतात, "या निवडणुकीत भाजप सेंटर स्टेजवर आहे. त्यांनी 'सायकोलॉजिकल वॉर' मध्ये विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसला कोणीही विचारत सुद्धा नाही. चर्चा फक्त टीआसएस आणि भाजपची आहे."