1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: सोमवार, 29 सप्टेंबर 2014 (15:34 IST)

कुमारिका भोजन

नवरात्रीचे व्रत करणारे भक्त नवमीच्या दिवशी कुमारिकांना भोजन देऊन व्रत पूर्ण करत असतात. या वयोगटातील बालिकांना नवमीला आमंत्रित करून त्यांचे पाय धुऊन त्यांना आसन किंवा पाटावर बसवावे, त्यांचे विधिवत पूजन करावे. त्यानंतर यथाशक्ती वस्त्र, अलंकार, पुष्प, माळा, सुगंधित तेल, चंदन, कुंकू, काजळ, अत्तर आदी वस्तू भेट द्याव्या. भोजनानंतर फळे व दक्षिणा देऊन त्यांना घराच्या उंबरठय़ापर्यंत सोडायला जावे. कुमारिकांना देण्यात येणार्‍या भोजनात एक-दोन गोड पदार्थ करावे. भोजन सुरू असताना दिवा प्रज्वलित ठेवावा. कुमारिकांना उपासकाने स्वत: वाढावे. उपासकाने मोठय़ा श्रद्धेने कुमारिकांना भोजनास बोलवावे. मनात कुठल्याही प्रकारचा आवेश, क्रोध ठेवू नये. कुमारिका लहान असल्याने त्यांच्याकडून पाणी सांडणे, उष्टे पाडणे या गोष्टी देवीच्या लीला समजून त्याकडे दुर्लक्ष करावे आणि श्रद्धेने नवरात्र व्रत करावे. 
 
कन्यापूजन 
 
 
एका कुमारिकेचे पूजन केले असता ऐश्‍वर्यप्राप्ती होते.
 
दोघींचे पूजन केले असता भोग व मोक्षप्राप्ती होते.
 
तिघींचे पूजन केल्याने धर्म-अर्थ-काम यांची प्राप्ती होते.
 
चौघींच्या पूजनाने राज्यपदप्राप्ती.
 
पाच जणींचे पूजन केल्याने विद्याप्राप्ती.
 
सहांच्या पूजनाने षटकर्मसिद्धी.
 
आठ जणींच्या पूजेने संपत्ती आणि
 
नऊ कुमारींची पूजा केली असता पृथ्वीचे राज्य मिळते.
 
दोन वर्षांची मुलगी कुमारी, तीन वर्षांची त्रिमूर्तिणी, चार वर्षांची कल्याणी, पाच वर्षांची रोहिणी, सहा वर्षांची काली, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, नऊ वर्षांची दुर्गा आणि दहा वर्षांची सुभद्रा-स्वरूपिणी संबोधिली जाते. कुमारीपूजनासाठी याहून मोठी मुलगी अग्राह्य होय.