रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑगस्ट 2024 (17:45 IST)

विनेश फोगाट: कुस्तीत वजन का मोजलं जातं? नियम काय सांगतात?

-जान्हवी मुळे
विनेश फोगाटकडे साऱ्या भारताचं लक्ष होतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली. पण वजनाच्या नियमात न बसल्याने विनेश अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली, आणि सुवर्ण पदक मिळवण्याचं स्वप्न भंगलं.
 
महिलांच्या फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये विनेश 50 किलो वजनी गटात खेळत होती. पण आज सकाळी फायनल पूर्वी वजन घेतलं गेल्यानंतर अधिकाऱ्यांना तिचं वजन प्रमाणित मर्यादेपेक्षा जास्त आढळलं.
 
भारतीय पथकाने हे काही ग्रॅम वजन घटवण्यासाठी थोडा अवधी मागितला, पण अखेर वजन घटवता न आल्याने विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं.
 
वजन महत्त्वाचं का?
कुस्तीच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळाडू हे विविध वजनी गटांमध्ये खेळतात. त्यामुळे जास्त वजनदार खेळाडूला कमी वजनाच्या खेळाडूशी खेळावं लागत नाही.
 
कुस्ती, बॉक्सिंग, ज्युडो, तायक्वांदोसारख्या लढाऊ खेळांमध्ये स्पर्धकांना समान संधी मिळावी म्हणून वजनाचा हा नियम करण्यात आलेला आहे.
 
हे नियम जाणून घेण्यासाठी आम्ही जागतिक युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या जागतिक कुस्ती संघटनेचे नियम तपासले आणि एका माजी पैलवान आणि प्रशिक्षकांशीही बोललो.
 
कोणत्याही क्रीडा स्पर्धांमध्ये दोन दिवसाच्या काळात ठराविक वजनी गटाच्या स्पर्धा होतात. प्रत्येक खेळाडू हा एकाच वजनी गटात खेळू शकतो. त्याचं किंवा तिचं वजन पहिल्या अधिकृत वजन चाचणीच्या वेळी जितकं असेल, त्या वजनी गटातच हा खेळाडू खेळतो.
 
हे वजन करताना कुस्तीचा सिंगलेट - म्हणजे One Piece युनिफॉर्म घालावा लागतो. या युनिफॉर्मचं वजन व्यक्तीच्या वजनातून वगळलं जात नाही.
 
प्रत्येक वजनी गटासाठी स्पर्धेच्या सकाळी वजन आणि मेडिकल चाचणी केली जाते.
पहिल्या सकाळी वैद्यकीय चाचणी होते ज्यामध्ये या पैलवानाला कोणताही संसर्गजन्य आजार नाही ना, याची तपासणी नियुक्त डॉक्टर्सद्वारे केली जाते.
या सगळ्या स्पर्धकांन् त्यांची नखं कापून कमी करावी लागतात. त्यानंतर खेळाडूंचं वनज केलं जातं.
तीस मिनिटांच्या या वैद्यकीय आणि वजन चाचणीनंतर खेळाडूंना त्या दिवशीचा सामना खेळता येतो.
फायनल्स आणि रिपेचाज म्हणजे कांस्य पदकासाठीच्या लढतींमध्ये खेळणाऱ्यांसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा वजन चाचणी होते. ही 15 मिनिटांची असते
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या नियमांनुसार या दुसऱ्या वजन चाचणीच्या वेळी वजनामध्ये कोणत्याप्रकारची सवलत दिली जात नाही.
 
नियमांनुसार, "या वजन चाचणीच्या पूर्ण कालावधीमध्ये पैलवानांना हवं तितके वेळा वजनकाट्यावर उभं राहण्याचा हक्क असतो. स्पर्धेसाठी खेळाडूंनी ज्या वजनी गटात प्रवेश घेतला आहे, त्यानुसार सर्वांचं वजन त्या त्या वजन मर्यादेत आहे का, याची खात्री करण्याची जबाबदारी रेफरीजची असते. खेळाडूंनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली आहे का, त्यांनी योग्य ड्रेस घातलाय का, हे त्या खेळाडूंना सांगण्याची जबाबदारी रेफरीजची असते."
 
जर एखाद्या खेळाडूकडून अटी पूर्ण झाल्या नाहीत, किंवा पहिल्या वा दुसऱ्या वजन चाचणीत खेळाडू पात्र ठरला नाही, तर त्याला स्पर्धेसाठी अपात्र घोषित केलं जातं. आणि सर्वात खालचा रँक या खेळाडूला देण्यात येतो.
 
ऑलिम्पिकमधील अंतिम फेरीत दाखल झालेल्या दोन पैकी एक कुस्तीपटू अपात्र ठरल्यास हा खेळाडू मेडलसाठीही पात्र ठरत नाही. अशा खेळाडूला अखेरचा नंबर दिला जातो.
 
विनेश अपात्र ठरल्यानं आता तिने सेमी फायनलमध्ये जिला हरवलं, त्या गझमनला रौप्य पदकासाठी फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळेल.
 
'वेट कटिंग' केवढं प्रचलित आहे?
एखाद्या खेळाडूनं विशिष्ठ वजनाच्या गटात बसण्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी वजन कमी करणं, याला 'वेट कटिंग' म्हणून ओळखलं जातं.
 
साधारणपणे एखाद्या स्पर्धेच्या दोन-तीन आठवडे आधी खेळाडू वेट कटिंग सुरू करतात. वजन हे असं हळूहळू कमी करणं सुरक्षित असतं, पण त्यात काही धोकेही आहेत असं एक स्पोर्टस न्युट्रिशनिस्ट सांगतात.
 
मग खेळाडू वजन का कमी करतात? यामागचं कारण ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी समजावूुन सांगतात, "कमी वजनाच्या खेळाडूंनी मोठ्या वजनी गटात जास्त वजनदार खेळाडूंसोबत खेळण्यानं नुकसान होऊ शकतं. त्यापेक्षा वजन कमी करून खालच्या वजनी गटात खेळण्याचा पर्याय अनेक खेळाडू स्वीकारतात."
 
स्पर्धेआधी उपाशी राहून वजन कमी करायचं, अधिकृत वजन मोजून झाल्यावर खाऊन प्रत्यक्ष सामन्यापर्यंत वजन वाढू द्यायचं, अशा गोष्टी खेळाडूंनी केल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत.
 
कुस्तीमध्ये आधी एका वजनी गटाचे सर्व सामने एकाच दिवशी खेळवले जायचे. म्हणजे सकाळी वजन घेतलं एक एक फेरी खेळून खेळाडू फायनलमध्ये जायचे आणि पदक मिळवायचे.
 
अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जागतिक कुस्ती संघटनेनं 2017 साली नियमांत बदल केला. तेव्हापासून ऑलिंपिक कुस्तीचे सामने एकाच दिवशी न घेता दोन दिवस घेतले जातात.
 
वजन घटवणं कठीण का?
मानवी शरीरात अगदी एका दिवसाच्या काळातही अनेकदा बदल घडून येतो, म्हणूनच स्पर्धेच्या दोन्ही दिवशी वजन करण्यात येतं.
 
एकदा तुम्ही एका विशिष्ट गटामध्ये प्रवेश केला, की तुम्ही दोन्ही दिवस त्यानुसार वजन कायम राखावं लागतं.
 
ऑलिम्पिकसाठी एखादा खेळाडू पात्रता फेरीत ज्या वजनी गटात खेळतो, त्याला त्याच वजनी गटात मुख्य ॲालिंपिकमध्ये खेळावं लागतं. म्हणूनच अनेकदा कुस्तीपटू त्यांच्या सध्याच्या वजनापेक्षा जास्त वजनी खेळात खेळायचं ठरवतात.
 
पण दुसरीकडे, आपल्या वजनापेक्षा कमी वजनी गटात खेळणं तितकं सोपं नसतं. कारण अॅथलीट्सना वजन कमी करावं लागतं आणि मुख्य म्हणजे स्पर्धेच्या दोन्ही दिवसांसाठी ते कायम राखावं लागतं.
 
बीबीसी मराठीशी बोलताना एका माजी कुस्तीपटूनं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं, " ही गोष्ट किती कठीण आहे, हे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणाच्याही हे लक्षात येईल. आपल्या वजनापेक्षा कमी वजनी गटात खेळणारे अनेक कुस्तीपटू त्यांचं खाणंपिणं कमी करतात. काहीतर उपाशी राहतात आणि याचा त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. प्रत्यक्ष कुस्तीआधी शरीराची झीज भरून येणं गरजेचं आहे. पण कधीकधी हे बदल अगदी टोकाचे असतात. ज्या खेळाडूंचं वजन अगदी काठावर आहे त्यांना तर खेळताना अतिशय ताणाला सामोरं जावं लागतं."
 
विनेशला यापूर्वीही वजन कायम राखण्याच्या या आव्हानाला तोंड द्यावं लागलंय.
 
2016 ऑलिपिंकसाठीच्या पहिल्या आशिया पात्रता फेरीत विनेशला तिचं वजन 48 किलो वजनी गटात आणणं कठीण गेलं होतं. नंतर ती क्वालिफाय झाली आणि याच गटात खेळली, पण दुखापतीमुळे तिला माघार घ्यावी लागली.
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती 53 किलो वजनी गटात खेळली, पण उपांत्य फेरीत ती हरली.
 
पॅरिस ऑलिम्पिकसाठी विनेशने वजन कमी करायचं ठरवलं, पण अखेरीस काही ग्रॅम वजनाची भारी किंमत तिला मोजावी लागली.