रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (14:53 IST)

शिक्षण अर्धवट राहिलेल्या ‘मुक्त’विद्यापीठातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

yashwant rao
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून अनेक कारणांनी बाजूला राहिलेल्या आणि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या वंचितांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अविरत काम करीत आहे. स्थापनेपासून गेल्या ३३ वर्षात या विद्यापीठाने आजतागायत लाखो शिक्षणवंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला असून गेल्या इ.स. २००० पासून मुक्त विद्यापीठात वेगवेगळ्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या आणि काही कारणांनी संबंधित मान्यताप्राप्त पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, अथवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण न करू शकलेल्या सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी देऊन त्यांना त्यांचे शिक्षणाचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याची एक अपूर्व संधी मुक्त विद्‍यापीठाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांनी ही माहिती दिली.
 
मुक्त विद्यापीठात स्थापनेच्या वर्षी १९८९-९० या शैक्षणिक वर्षासाठी ३,७५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मुक्त शिक्षणाला उदंड प्रतिसाद मिळत जाऊन आज ही प्रवेशसंख्या पाच लाखावर पोहोचली आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू असून आजमितीस सुमारे तीन लाखांचा टप्पा गाठला आहे. या वर्षीही मुक्त विद्यापीठाला अपूर्व असा प्रतिसाद मिळत असून पाच लाखांपेक्षा अधिक टप्पा याही वर्षी गाठला जाईल, असा विश्र्वास डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
 
मुक्त विद्यापीठात शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रवेश घेत असतात. अनेक कारणांनी काही विद्यार्थी तो शिक्षणक्रम विद्यापीठाच्या विहित मुदतीत पूर्ण करू शकत नाही. गेल्या बावीस वर्षात अशी प्रवाहाबाहेर राहून गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे साडेतीन लाख आहे. त्यांना लवकरच आवाहन करून, पत्र पाठवून त्यांचे अपुरे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठ लवकरच उपलब्ध करून देणार आहे. त्याबाबत प्रक्रिया सुरू असून विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबतचे सविस्तर माहितीपत्रक उपलब्ध होईल, असे डॉ. देशमुख यांनी कळविले आहे.