गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (16:07 IST)

निर्बंध कडक! रुग्णसंख्येनुसार यलो, ऑरेंज, रेड झोनची निर्मिती, आयुक्तांचा आदेश

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत वेगाने वाढ होत आहे. दिवसाला 1400 हुन अधिक कोरोना रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. गृहनिर्माण सोसायटी, वस्ती, कॉलनीचे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येनुसार तीन विभागात वर्गीकरण करण्यात आले आहे.
 
यलो, ऑरेंज आणि रेड झोनची निर्मिती करण्यात आली आहे.  तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावरील कारवाईसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय हद्दीत एक याप्रमाणे आठ अंमलबजावणी पथके निर्माण केली आहेत.  याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.
 
शहरात आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘अ’ एकूण लोकसंख्येच्या 5% पेक्षा कमी रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास पिवळा भाग (यलो झोन), ‘ब’ – एकूण लोकसंख्येच्या 5 ते 20% रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास नारंगी भाग (ऑरेंज झोन) आणि एकूण लोकसंख्येच्या 20% पेक्षा जास्त  रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास लाल भाग (रेड झोन) घोषित करण्यात येणार आहे. तसे फलक त्या-त्या परिसरात लावले जाणार आहेत.
 
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनामास्क वावरणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, सॅनिटायजरचा सुविधा न करणे याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 8 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. भाजी मंडई, बाजार पेठ, मजूर अड्डे यांसह इतर गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात आहे का? नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना सील करण्यासाठी स्वतंत्र 8 पथके नेमण्यात आली आहेत. यात दोन पोलिसांचा समावेश असणार आहे.
 
आठ क्षेत्रीय कार्यालयात वॉर रूम, हेल्पलाईन कार्यान्वित केली जाणार आहे. आकाशचिन्ह परवाना विभागामार्फत जनजागृती फलक लावले जाणार आहेत.  प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्ती वाढवण्यात आल्यात. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश. कोरोनाच्या नियमांची आठवण करून देण्यासाठी रिक्षा, टेम्पोद्वारे जनजागृती केली जाणार आहे.