गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2023 (13:33 IST)

प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा, जाणून घेऊ प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिर संपूर्ण माहिती

dagdusheth ganpati
पुण्यातील गणपती भाविकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. त्यामुळं आता पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सी दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. चिंचवडच्या मोरया गोसावी देवस्थानच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचंही आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
यामुळे आपण जाणून घेऊ या मंदिर आणि संस्थान बद्दल पूर्ण महितीपर रिपोर्ट .
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती—भक्तांचे लाडके आराध्य-दैवत! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुणे शहराच्या गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता येईल. दरवर्षी भारतभरातले आणि देशोविदेशीचे असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात.
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भक्तांच्या आदर-भक्तीचे स्थान तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था म्हणूनही हे स्थान ओळखले जाते. ’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ या नावाने ही कार्ये केली जातात. या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे.
 
अनेक वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीत आपला एकुलता एक पुत्र गमावल्यानंतर श्री. दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी ह्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. दरवर्षी केवळ दगडूशेठ यांचे कुटुंबच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील सर्व मंडळी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असत.
 
 त्यावेळी ऐन तारुण्यात असलेले तात्यासाहेब गोडसे हे ह्या गणेशोत्सवाचे एक उत्साही कार्यकर्ते होते. नंतरच्या काळात जेव्हा लोकमान्य टिळकांनी, स्वातंत्र्य-चळवळीसाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजिनिक उत्सवाचे स्वरूप दिले, तेव्हा दगडूशेठ गणपतीला पुण्यातील सर्वाधिक लोकप्रियतेचे आणि आदराचे स्थान मिळाले.
 
१९५२ साली दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर-उत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तात्यासाहेब आणि त्यांच्या मित्रमंडळींवर येऊन पडली. तात्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे सहकारी मामासाहेब रासणे, अॅड. श्री. शंकरराव सूर्यवंशी आणि श्री. के. डी. रासणे या मंडळींनी हा उत्सव अत्यंत चोखपणे पार पाडला. आणि त्यानंतर ह्या मंडळाने कधी मागे वळून पाहिलेच नाही! भक्तांनी आणि दानशूर दात्यांनी मंदिराच्या फंडासाठी उदारहस्ते देणग्या द्यायला सुरुवात केल्यावर तात्यासाहेब आणि त्यांचे मित्र यांना वाटू लागले की ह्या पैशांतून आपल्याच बांधवांची सेवा करण्याहून अधिक मोठी ईश्वर-सेवा काय असू शकणार?
 
लौकरच ह्या ध्येयवेड्या तरुण कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या कार्याची व्याप्ती पारंपरिक पूजाअर्चेच्या पलिकडे नेऊन सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. मंदिरातले धार्मिक विधी थाटामाटाने साजरे करत असतानाच या तरुणांनी आपल्या राज्याच्या सामाजिक व राजकीय प्रश्नांकडे लक्ष वळवले.
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट्च्या अखत्यारीत त्यांनी कितीतरी सामाजिक कार्यांचा प्रारंभ केला. वंचित मुलांना शैक्षणिक आणि आर्थिक मदत, छोटे उद्योगधंदे करू इच्छिणाऱ्यांना किंवा फेरीवाल्यांना सुवर्णयुग सहकारी बँकेमार्फत आर्थिक सहाय्य, वृद्धाश्रम, वीटभट्टी-कामगारांचे पुनर्वसन ही नमुन्यादाखल काही उदाहरणे.
 
आज श्रीगणेशांच्या आशीर्वादाने ’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ हा एक आघाडीची संस्था म्हणून समृद्ध झाला आहे. मानवजातीची सेवा हीच परमेश्वराची सेवा या भावनेने काम करण्याचे समाधान मोठे आहे.
पुण्यातील पाच मानाच्या गणपतीत दगडूशेठ हलवाई गणपती नसले तरी सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. या मंडळाची स्थापना 1893 साली झाली. 1893 मध्ये श्रीमंत दगडू शेठ हलवाई यांनी ही मुर्तीची स्थापना केली. 1968 साली 'दगडूशेठ गणपती'ची मूर्ती मंडळाने तयार करून घेतली. प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरअप्पा शिल्पी यांच्या कल्पनेतून ही मूर्तिकला पुर्ण झाली. ही मुर्ती घडविताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते.
 
'दगडूशेठ गणपती'ची मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्यावेळी सूर्यग्रहण आले होते. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसविले आहे. 'यामुळे त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल,' अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आदर केला. संपुर्ण धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली.
 
पुढे 1984 मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरात या गणेश मुर्तिची स्थापना झाली. या मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने आणि आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले होते. मंदिर परीसर अपुरा पडू लागल्यानंतर 2002 साली सध्याचे जे भव्य मंदिर आहे ते उभारण्यात आले होते. आता संस्थानच्या तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या संस्थानचे नेतृत्व आहे.
 
मंदिरातील कार्यक्रमाचे वेळापत्रक
 
वेळ कार्यक्रम
स. ६.०० मंदिर उघडते
स. ६ ते ७.३० सर्वांसाठी दर्शन
स. ७.३० ते ७.४५ सुप्रभातम् आरती
स. ८.१५ ते १.३० सर्वांसाठी दर्शन
दु. १.३० ते १.४५ महानैवेद्य आरती
दु. २.०० ते ३.०० सर्वांसाठी दर्शन
दु. ३.०० ते ३.१५ मध्यान्ह आरती
दु. ३.१५ ते रा. ८.०० सर्वांसाठी दर्शन
रा. ८.०० ते ९.०० श्रींची महामंगल आरती
रा. ८.१५ ते १०.३० सर्वांसाठी दर्शन
रा. १०.३० ते १०.४५ शेजारती
रा. १०.४५ ते ११.०० सर्वांसाठी दर्शन
रा. ११.०० मंदिर बंद
आरतीच्या वेळा
 
वेळ कार्यक्रम
७.३० ते ७.४५ सुप्रभातम् आरती
१.३० ते १.४५ महानैवेद्य आरती
३.०० ते ३.१५ मध्यान्ह आरती
८.०० ते ९.०० श्रींची महामंगल आरती
१०.३० ते १०.४५ शेजारती
अभिषेक आणि गणेशयाग वेळा
 
 
वेळ कार्यक्रम
रोज सकाळी ८ ते दुपारी ३ दैनंदिन अभिषेक
सकाळी ८ ते दुपारी १२ मासिक गणेशयाग(दर मंगळवार व विनायकी चतुर्थीस)
सकाळी ८ ते दुपारी १२ विशेष गणेशयाग(अंगारकी चतुर्थी, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा, दिवाळी पाडवा आणि गणेश जन्म)
सकाळी ८ ते १० संकष्टी चतुर्थी महाभिषेक
टीप : संकष्टी चतुर्थी महाभिषेक आणि गणेशयागास मंदिरात आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.
 
मंदिरातील आरती आणि अभिषेक हे अत्यंत पवित्र आणि सुंदर प्रसंग असतात. विशुद्ध भक्तिभावाने या प्रसंगांचा अनुभव घेणे आणि श्रींचे आशीर्वाद मिळणे हा एक महत्त्वपूर्ण योग असतो. आरती आणि अभिषेकाच्या विधींसाठी आपली उपस्थिती हा अतिशय आनंदाचा भाग आहे. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमधे वेगवेगळ्या आरत्या असतात. या आरत्यांच्यावेळी आमच्याबरोबर सहभागी होणे आपल्याला सोयीचे जावे यासाठी आम्ही त्यांचे दैनंदिन वेळापत्रक देत आहोत.

सूचना: काही विशिष्ट निमित्ताने आपल्याला अभिषेक करायचा असेल तर +९१ २० २४४७९२२२ या क्रमांकावर आपण  संपर्क साधू शकता.



Edited By - Ratnadeep ranshoor