सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या कुटूंबियानी त्याचे अपहरण करीत मुंडन केले आहे. या कुटूंबियास पोलीसांनी अटक केली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनाली राहूल निंबाळकर, राहूल दिगंबर निंबाळकर (रा.दोघे कोथरूड पुणे), निलेश सुरेश जाधव, सागर शिवाजी गायकवाड (रा.दोघे लक्ष्मीनगर,पर्वती पूणे) व जयसिंग कौर तेजींदरसिंह छाबडा (रा.सेंटर स्ट्रीट कॅम्प पुणे) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी विलास मलकान चव्हाण (१८ रा.नाना शिताने तांडा ता.जि.धुळे) या युवकाने तक्रार दाखल केली आहे.
निंबाळकर कुटूंबियातील विवाहीतेशी धुळे येथील तरूणाची ओळख झाली होती. त्यामुळे तो तिच्या संपर्कात होता. कालांतराने त्याने महिलेशी अश्लिल संभाषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने त्यास सज्जड दम भरला. तरीही तो महिलेस अश्लिल मॅसेज पाठवू लागला. ही बाब महिलेने पतीस सांगितल्याने त्याने मित्रासह पत्नीस सोबत घेवून धुळे गाठले. तरूणाचे घर गाठून संतप्त पुणेकरांनी त्यास बेदम मारहाण केली. तसेच त्यास बळजबरीने बसवून थेट नाशिकमधील पंचवटीतील फुलेनगर भागात नेवून त्याचे एका सलून दुकानात मुंडन केली. ही बाब नागरीकांनी पोलीसांना कळविल्याने हा प्रकार समोर आला असून पोलीसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक साखरे करीत आहेत.