गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 3 मे 2021 (07:53 IST)

पुण्याजवळ वीज कोसळून दोन मुलींचा जागीच मृत्यू, एक जखमी

पुणे शहराजवळील नसरापूर येथील कातकरी वस्तीजवळ वीज कोसळून खेळत असणाऱ्या दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला तर एक जण किरकोळ जखमी झाली आहे. नसरापूर येथील चेलाडी वस्तीवर  हा प्रकार घडला. सीमा अरुण हिलम (वय 11), अनिता सिकंदर मोरे (वय 9) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. तर चांदणी प्रकाश जाधव ही मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोसाट्याचा वारा वाहत असताना या तिन्ही मुली घराजवळच खेळत होत्या. विजांचा कडकडाट होत असल्याने कुटुंबीयांनी या मुलीला लवकर घरात या असा आवाज दिला. परंतु या मुली घरात येत असतानाच विजेचा मोठा आवाज झाला. कुटुंबीयांनी बाहेर येऊन पाहिले असता त्या मुली उंचावरून खाली पडल्या होत्या. कुटुंबियांनी तातडीने या मुलींना जवळच्या रुग्णालयात अ‍ॅडमिट केले असता यातील दोघींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.