शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (23:31 IST)

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी ‘सुपर 75’ उपक्रम

नागपूर महापालिकेने शहरातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी ‘सुपर 75’ हा उपक्रम हाती घेतला आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनाही उच्चशिक्षण मिळावं यादृष्टीनं सुपर 75 उपक्रमाअंतर्गत एनडीए, वैद्यकीय या क्षेत्रातील प्रवेशपूर्व परिक्षांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन देण्यात येणार आहे.या उपक्रमांचा शुभारंभ महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला.महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची परिक्षा घेवून त्यातील 75 विदयार्थ्यांची या उपक्रमाकरता निवड करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त ‘आझादी- 75 अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत ‘सुपर- 75’ या मनपाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमाद्वारे ‘आझादी-75’च्या वर्षभराच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
 
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे. मात्र अनेक विद्यार्थी योग्य मार्गदर्शना अभावी  पुढे जाउ शकत नाही. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळाल्यास ते मोठी झेप घेण्याची जिद्द ठेवतात.महापालिका शाळांमधील अशाच प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना भविष्यात केवळ परिस्थितीमुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्यात अडथळे येउ नयेत यासाठी नागपूर महानगरपालिकेने ‘सुपर-75’चा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात मनपाच्या शाळेतील 75 विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रासह देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज होऊ शकतील. केवळ परिस्थितीने महापालिका शाळातील विदयार्थी मागे राहू नयेत यासाठी त्यांच्यासाठी काही करण्याची संकल्पना  पुढे आली. यामध्ये विद्यार्थ्यांना ‘नीट’ आणि ‘एनडीए’ करिता सुद्धा तयार करण्याचे निश्चित झाले, त्यासाठी प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नागपूर शहरातील असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटद्वारे यासाठी नि:शुल्क सेवा देण्यात येणार आहे. असोसिएशनद्वारे मनपाच्या इयत्ता आठवी मधील सुमारे 850विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यात सर्वोत्तम कामगिरी दर्शविणा-या 75विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हा उपक्रम मनपाद्वारे दरवर्षी सुरू राहणार आहे. 25 विद्यार्थ्यांना जेईई, 25 विद्यार्थ्यांना नीट आणि 25 विद्यार्थ्यांना एनडीए साठी तयार करण्याच येणार आहे. शहरातील खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत नि:शुल्क शिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये शैक्षणिक साहित्य मनपाद्वारे पुरविण्यात येतील.