बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (17:32 IST)

सरकार नीट काम करत नाही म्हणून आम्हाला ही.... - अजित पवार

राज्यात तीन वर्षांपूर्वी आलेलं सरकार नीट काम करत नाही म्हणून आम्हाला ही हल्लाबोल पदयात्रा काढावी लागत आहे. याआधीही मा. शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जळगाव ते नागपूर अशी दिंडी काढली होती. शेतकरी तेव्हाही हवालदिल झालेला होता, आजची परिस्थितीही तशीच आहे म्हणून ही पदयात्रा. असे मत अजित पवार यांनी यवतमाळ येथे व्यक्त केले आहे, 
अजित पवार पुढे म्हणतात की आज हे सरकार शेतकऱ्यांना निकडीची असलेली कर्जमाफी देत नाही. रोज तारीख पे तारीख जाहीर करत आहेत. खोट्या जाहिराती देण्यात मग्न आहे हे बोगस सरकार आहे. सोयाबीनला भाव नाही. कापसाची पण तीच अवस्था. हे सरकार कोणत्याच समाजाला न्याय देत नाही. या सरकारला आता आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवावाच लागेल. फवारणी करत असताना शेतकऱ्यांनी जीव गमावला हेच का सरकारचे लाभार्थी का? बोंड आळीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. केंद्रात, राज्यात यांचंच सरकार आहे तरी शेतकऱ्यांना न्याय दिला जात नाही.
 
 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. गुजरात निवडणुकीत राहुल गांधी, राजीव गांधी यांच्या जातीचा विषय काढला जातो हे काय देशाच्या हिताचा विषय आहे का? तणाव कसा निर्माण होईल याच्या प्रयत्नात हे सरकार कायम असतं. महिलांवर आज अत्याचार वाढत आहे हे या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच होत आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार केला जातो, त्यांना मारहाण केली जाते, या सरकारला कसली मस्ती चढली आहे. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी या पदयात्रेत महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे बोलत सरकारव पवार यांनी टीका केली आहे.