गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2018 (16:43 IST)

पूर्ण कर्जमाफी होईपर्यंत हल्लाबोल सुरुच राहणार; सुनील तटकरे

साडे तीन वर्षांपूर्वी जी माणसं सत्तेवर आली, त्यांनी मनात येईल ते आश्वासन लोकांना दिले. पण त्यांनी आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण करण्याच्या हेतूने पाऊल उचलले नाही. त्यामुळे जो पर्यंत संपूर्ण कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही हे हल्लाबोल आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारला दिला. हल्लाबोलआंदोलनादरम्यान औसा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
 
गेले तीन दिवस उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातून ज्या प्रकारे हल्लाबोल आंदोलनाला पाठिंबा मिळाला, त्याच तोडीचा प्रतिसाद आजच्या औसा येथील सभेलाही मिळाला. औसा नगरपालिकेमध्ये जातीयवादी शक्तींना बाजूला सारत इथल्या जनतेने राष्ट्रवादीची सत्ता आणली, असे म्हणत त्यांनी औसा येथील जनतेचे व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनापासून अभिनंदन केले.
 
हे सरकार समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. हे सरकार बदलण्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ आणि आम्ही तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देऊ. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने असलेल्या आर्थिक महामंडळाला मी व अजितदादांनी ५०० कोटींचा निधी दिला होता. सामाजिक व धार्मिक समानता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण दिले. हे करत असताना आमच्यावर आरोप झाले. मात्र आम्हाला त्याबाबत काही फरक पडत नाही. आता फक्त दीड वर्षांचा कालावधी उरला आहे. जनतेने फक्त थोडी कळ काढावी. आपण गावागावात जाऊ आणि ही परिस्थिती बदलू व परिवर्तन घडवू, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
 
विधिमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले की शहाजी राठोड या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या पत्नीने मुख्यमंत्री निधीतून मदत मागितली, तेव्हा सरकारने त्यांना मदत मिळणार नाही म्हणून सांगितले. पण आदानी, अंबानी, विजय मल्ल्या या भांडवलदारांना मात्र हजारो कोटींची कर्जमाफी मिळते. त्यामुळे हे सरकार नक्की कुणाचे आहे ? असा प्रश्न आम्हाला पडतोय. ही परिस्थिती बदलायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या हल्लोबोल आंदोलनाला पाठिंबा द्या. आपण या सरकारला जागेवर आणण्याचे काम करू.
 
जेव्हा किल्लारी भूकंप झाला होता, तेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री होते. सकाळी सात वाजता ते किल्लारीमध्ये पोहोचले होते. त्यांनी कसलीही वाट न पाहता तात्काळ पुर्नवसनाचे काम चालू केले. नेता असावा तर असा! पण सध्या राज्याची अवस्था बिकट आहे. आज किल्लारीमध्ये रस्ते बांधायलाही पैसे दिले जात नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.