गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (08:48 IST)

दिवाळीनंतर सर्व महाविद्यालये सुरु होणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

ग्रामीण भागासह शहरातील शाळा सुरु झाल्यानंतर आता महाविद्यालये नियमितपणे सुरु करण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. प्रथमत: अंतिम वर्षाचे वर्ग सुरु करुन टप्प्याटप्प्याने अन्य वर्ग सुरु करण्याचे नियोजन आहे. ज्या विद्यापीठांना दिवाळीपूर्वी महाविद्यालये सुरु करणे शक्य आहे, त्यांना परवानगी दिली जाणार असून, दिवाळीनंतर सर्वांनाच महाविद्यालये सुरु करण्याचे आदेशही त्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरुंना दिले आहेत.
 
मंत्री उदय सामंत यांनी  राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी ऑनलाईन पध्दतीने संवाद साधला. यावेळी महाविद्यालयांचे वर्ग नियमितपणे सुरु करताना येणार्‍या अडचणी कुलगुरुंनी मांडल्या. मात्र, राज्यात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले आहेत. त्याच धर्तिवर महाविद्यालये सुरु करण्यात येतील. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रथमत: बोलवले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात शिकवण्यात येणार आहे. राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या जिल्ह्यातील महाविद्यालये दिवाळीनंतर सुरु करण्याचे नियोजन करा, असे आदेशही मंत्री उदय सामंत यांनी दिले. मराठवाडा व विदर्भातील काही विद्यापीठांनी अंतिम वर्षाचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील इतर विद्यापीठांनीही आता अंतिम वर्षाचे वर्ग सुरु करण्याचे आदेश मंत्री सामंत यांनी दिले आहेत. ज्या विद्यापीठांना दिवाळीपूर्वी वर्ग सुरु करणे शक्य होईल, त्यांनी सुरु करावेत. ज्यांना अशक्य आहे, त्यांनी दिवाळीनंतरचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले.