सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (17:52 IST)

बच्चू कडूंना 2 महिन्यांचा कारावास, माहिती लपवल्याप्रकरणी दोषी

निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती लपवल्याप्रकरणी राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत संपत्तीची माहिती देणाऱ्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या मुंबईमधील फ्लॅटची माहिती दिली नव्हती. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत कडू यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्ये याप्रकरणी तक्रार केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मात्र याप्रकरणी वरच्या न्यायालयात दाद मागणार असून, न्यायालयाकडून दिलासा मिळेल याची खात्री असल्याचं म्हटलं आहे.
 
नेमकं प्रकरण काय?
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
बच्चू कडूंच्या मुंबईत असलेल्या एका फ्लॅटच्या संदर्भातील माहिती प्रतिज्ञापत्रामध्ये दिली नसल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं.
 
2017 मध्ये या प्रकरणी बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, असं भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी सांगितलं. न्यायालयानं याबाबत साक्षीपुरावे तपासल्यानंतर दोन महिन्यांची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे, असं ते म्हणाले.
 
चुकीचा असला तरी निर्णय मान्य - कडू
या प्रकरणी स्पष्टीकरण देताना बच्चू कडू यांनी फ्लॅटची पूर्णपणे लपवली नव्हती तर घर क्रमांक लिहिण्यात चूक झाली होती, असं सांगत स्पष्टीकरण दिलं आहे.
 
"2014 च्या आधी आमदारांची एक सोसायटी केली होती. त्यात सरकारनं कर्जाची हमी घेत त्यातून घरं दिली होती. त्याच घरावर आपण कर्ज काढलं होतं.
या कर्जाची रक्कम निवडणूक अर्जात टाकली होती, पण घराचा क्रमांक आणि घराची माहिती टाकली नाही ही चूक झाली. मात्र आम्ही घर असल्याचं दाखवलं आहे," असं कडू म्हणाले.
 
बदला घेण्यासाठीचा डाव
न्यायालयानं या प्रकरणी चुकीचा निर्णय दिला आहे. पण तरीही न्यायालयाचा आम्ही सन्मानच करतो. हा गुन्हा अचपूरला झाला, तक्रार करणारा चांदूरबाजारचा आहे तर तक्रार आसेगावला झाली, असं कडू म्हणाले.
 
"ज्या ठाणेदारानं एका गरीबाला 20 हजारांना लुबाडलं होतं. त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं समज दिली. त्यामुळं त्यानं डाव काढण्यासाठी आसेगावला तक्रार घेतली. तसंच विरोधकाच्या साथीनं खटला तयार केला," असंही बच्चू कडू म्हणाले.
 
याच प्रकरणात शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र आम्ही वरच्या न्यायालयात जाणार आहोत. न्यायालय आमच्याबरोबर न्याय करेल असा विश्वास आम्हाला आहे, असं कडू यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले.