1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (20:47 IST)

“बोलून मोकळं व्हायचं” असं का म्हणाले? व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्टीकरण

eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वीचा असल्याचं व्हिडीओवरून दिसत आहे. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी या तिघांमध्ये झालेल्या संभाषणावरून विरोधकांनी परखड शब्दांत टीका करायला सुरुवात केल्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर येत यासंदर्भात खुलासा केला आहे. तेव्हा नेमकं काय घडलं होतं, याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
 
पत्रकार परिषदेमध्ये जाताना फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याचं बोलायचं, इतर काही राजकीय वक्तव्य करायचं नाही अशी आमची चर्चा झाली होती, पण सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यामध्ये तोडफोड करुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असा मेसेज पसरवला जात आहे, ते चुकीचं आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. अपप्रचाराला आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टींना मराठा समाजाने बळी पडू नये असंही मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
 
काय आहे या व्हिडिओमध्ये?
मराठा आरक्षण व मनोज जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. ही पत्रकार परिषद सुरू होण्याच्या काही मिनीट आधीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
पत्रकार परिषदेच्या ठिकाणी येताना मुख्यमंत्री “आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं आणि निघायचं”, असं म्हणताना दिसत आहेत. त्यापुढे अजित पवार “येस, येस” असंही म्हणत आहेत. त्याच्याबरोबर असणारे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना माईक चालू असल्याची जाणीव करून दिल्यानंतर अजित पवारांनीही त्यातून आवाज जात असल्याचं सांगितलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याची टीका केली.
 
नेमकं तेव्हा काय घडलं होतं?
दरम्यान, आपण व्हायरल व्हिडीओत दिसणारं संभाषण नेमकं का करत होतो? यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. “सह्याद्रीमध्ये आम्ही बैठक घेतली. त्या बैठकीत साधक-बाधक चर्चा झाली. राज्यात कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे. राज्यात सर्व जातीधर्मांचे लोक गुण्या-गोविंदाने राहात आहेत. शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हिताचं आहे. त्यासाठी आंदोलनाबाबत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर आम्ही तिघं आपल्याशी चर्चा करायला आलो”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
 
चर्चेपूर्वी आम्ही पत्रकार परिषदेच्या ठिकाणी बोलतच येत होतो. पण ‘सकारात्मक मुद्द्यांवरच बोलू, कोणतंही राजकीय बोलणं नको’ अशी आमची चर्चा चालू होती. ‘तेवढं बोलून आपण निघू’ असं आम्ही बोललो. ‘कोणतंही राजकीय भाष्य नको’ अशी आमची चर्चा होती. पण आज त्या शब्दांचे पुढचे-मागचे शब्द काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, मराठा समाजात संभ्रमाचं वातावरण निर्माण होईल असा प्रयत्न केला गेला. विघ्नसंतोषी लोकांकडून हे प्रयत्न झाले, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
 
दरम्यान, फडणवीसांनी दिलेलं आरक्षण टिकू शकलं नसल्याचं सांगत शिंदेंनी उद्धव ठाकरे सरकारवर टीकास्र सोडलं. “मी तर एवढंच सांगेन की जेव्हा फडणवीसांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं, उच्च न्यायालयात ते टिकलं. पण सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही. कुणामुळे त्यावर आज मी बोलू इच्छित नाही”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले
 
३७०० अधिसंख्य पदांवर नियुक्त्या देण्याचं धाडस कुणी करत नव्हतं. आम्ही तो निर्णय घेतला. आज तरुण त्या पदांवर काम करत आहेत. सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत प्रामाणिक आहे. म्हणून त्या दिवशी आपण सर्वपक्षीय नेत्यांना चर्चेला बोलवलं. काही लोक जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून मराठा समाजातल्या लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याला कुणी बळी पडू नका. आमच्या सगळ्यांची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका सरकारची स्पष्ट आहे, असंही ते म्हणाले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor