शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (15:15 IST)

चिपळूणवर ढगफुटी! अतिवृष्टीने भीषण स्थिती; २००५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती

मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत पावसाने मुक्काम ठोकला असून, गेल्या २४ तासांत पावसाने कोकणात रौद्ररुप घेतलं आहे. बुधवारी रात्रीपासून कोकणात मुसळधार पाऊस होत असून, अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे चिपळूनमध्ये दाणादाण उडाली आहे. पावसाचा कहर सुरू असून, तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे.
 
शहराच्या अनेक भागात पाणी शिरलं असून, अंतर्गत मार्गही बंद झाले आहेत. यामुळे चिपळूनमध्ये २००५ ची पुनरावृत्ती होते की काय या धास्तीने नागरिकांची झोपच उडाली आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे. २६ जुलै २००५ ला ढगफुटी झाल्यामुळे चिपळूण शहरात आणि खेर्डी बाजारपेठेत पाणी साचले होते. कोट्यवधींची हानी झाली होती. यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्याने चार दिवस हाय अलर्ट राहण्याचा इशारा दिल्यामुळे आणि सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने व्यापाऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना केल्या होत्या.