उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रमजान ईदनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा
ईद-उल-फितर तथा ‘रमजान ईद’ आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करणारा पवित्र सण आहे. आज आपला ‘कोरोना’विरुद्ध लढा सुरु आहे, तो आपण अजून जिंकला नसला तरी निर्णायक टप्प्यावर आहे. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करावी आणि गळाभेटीऐवजी फोनवरुन नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान ईद’निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून राज्यासह देशात टाळेबंदी सुरु आहे. या टाळेबंदीत पवित्र रमजान महिन्याच्या काळात मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले तरावीहची नमाज, रोजा सहेरी, रोजा इफ्तार आदी धार्मिक कार्यक्रम घरीच पार पाडले. अजूनही ‘कोरोना’चे संकट असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी आपल्या घरात थांबूनच ‘रमजान ईद’ची नमाज अदा करावी. कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर गर्दी करु नये, मशिदीत, रस्त्यावर, मैदानात एकत्र येऊ नये, जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत. ईदची नमाज अदा केल्यानंतर प्रत्यक्ष गळाभेटी, भेटीगाठी घेण्यापेक्षा मोबाईलवर नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात. ‘कोरोना’चे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. सर्वांनी केंद्र, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून रमजान ईद आनंदाने साजरी करावी, असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
‘कोरोना’ची लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे, आता हळूहळू टाळेबंदी उठविण्याबाबत सरकार योग्य तो निर्णय लवकरच जाहीर करेल. आता आपल्याला ‘कोरोना’ सोबतच राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित करायची आहे. त्यासाठी सरकार योग्य ते नियोजन करत आहे. नागरिकांच्या योग्य सहभागाची आवश्यकता आहे. या पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी या कामी सरकार सोबत राहण्याचा संकल्प करुया, ‘कोरोना’ची लढाई जिंकल्यानंतरच मिठी ईद उत्साहाने साजरी करुया, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान ईद’च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.