शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (11:34 IST)

आता स्वयंचलित पिंजरा, वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपता येणार

चंद्रपूर जिल्ह्यतील एका पशुवैद्यक अधिकाऱ्याच्या संकल्पनेतून आणि वनाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे रिमोटच्या सहाय्याने हाताळला जाणारा स्वयंचलित पिंजरा तयार करण्यात आला आहे.
 
अत्याधुनिक असा हा पिंजरा ३० फूट अंतरावर बसूनही रिमोटच्या सहाय्याने संचालित करता येतो. पिंजऱ्यातील यंत्रणेत नेटवर्क असणाऱ्या भ्रमणध्वनी कंपनीचे सिमकार्ड टाकायचे. ही यंत्रणा हाताळण्यासाठी असणारा अ‍ॅप संबंधित वनाधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीत राहील. पिंजऱ्याच्या आत तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे रात्रीदेखील काम करतील. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पिंजऱ्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपता येतील. विशेष म्हणजे, वाघांच्या अंगावरील पट्टे यामुळे तपासता येतील. त्यासाठी वारंवार पिंजऱ्याच्या जवळ जाण्याची गरज नाही. त्यात आता पुन्हा अत्याधुनिक सेन्सर लावण्यात येणार आहे. ज्यामुळे वन्यप्राणी आता गेल्यानंतर तो आपोआप बंदिस्त होईल. पिंजऱ्याच्या खालच्या बाजूला एक सेन्सर लावण्यात येणार असून या माध्यमातून त्या प्राण्याचे वजन कळेल. याआधी वन्यप्राण्याचे वजन करण्यासाठी त्याला बेशुद्ध करावे लागत होते. चौथा अधिकचा कॅमेरा पिंजऱ्याच्या बाहेर  लावण्यात आला आहे. त्याला ३० फु टाची वायर आहे. ज्यामुळे पिंजऱ्यातील वन्यप्राणी जंगलात सोडताना दुरूनच चित्रीकरण होईल. सौर पॅनलवर आधारित पिंजऱ्याला एक बॅटरीही देण्यात आली आहे. चार्ज करून ठेवलेली ही बॅटरी किमान १८ तास पिंजरा संचालित करू शकेल. त्यामुळे पावसाळ्यात अडचण येणार नाही.