1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 डिसेंबर 2020 (16:07 IST)

ट्विटरवरुन व्हिडिओ क्लीप शेअर करत फडणवीस यांचे गोपीनाथ मुंडेंना अभिवादन

Fadnavis greets
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचीही जयंती साजरी करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरुन गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलंय. 
 
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ क्लीप शेअर केली आहे. त्यामध्ये, गोपीनाथ मुंडेंनीच माझ्यासारख्या सामान्य तरुणाला राजकारणाचे धडे दिले, महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधानसभेबाहेर मी हे धडे घेतले, असे फडणवीस म्हणत आहेत. एका छोट्याशा गावातून निघालेला हा तरुण, कुठल्याही राजकीय पाठबळाशिवाय, कुठल्याही पैसा, ताकद आणि संघटनेशिवाय पुढे निघाला. एकच गोष्ट मुंडेसाहेबांकडे होती, ती म्हणजे प्रचंड आत्मविश्वास आणि हिंमत. याच हिंमतीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या तरुणाने न्यूयॉर्कपर्यंत मजल मारली. न्यूयॉर्कच्या युएन जनरल असेम्बलीमध्ये त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं, त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. 
 
गोपीनाथ मुंडेंनी मला एक राजकीय मंत्र दिला, संघर्ष करायला आम्ही जे शिकलो ते गोपीनाथरावांमुळेच शिकलो. गोपीनाथराव मला एकच गोष्ट सांगायचे. देवेंद्र... जीवनात मोठं व्हायचं असेल तर सत्तेशी समझोता करु नको, सत्तेशी संघर्ष कर. सत्तेशी समझोता करुन कोणालाही पुढे जाता येत नाही, मोठं होता येत नाही. पण, सत्तेशी संघर्ष केल्यानंतर आपणास जीवनात मोठं होता येतं. आज गोपीनाथराव प्रत्यक्ष रुपाने नसले तरी, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठिशी आहे. कितीही संकटं आली तरी, संकटावर मात करायला आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो आहोत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं आहे.