सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2023 (17:25 IST)

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच रामनवमीला ‘दंगल’ झाली, पण का?

- श्रीकांत बंगाळे
छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा या भागात मी काल सकाळी 8 वाजता पोहोचलो, तेव्हा महापालिकेचे कर्मचारी रस्ता स्वच्छ करत होते.
 
रस्त्यावर साचलेले दगड, काचा ते उचलत होते. शिवाय पाणी फवारून काळाकुट्ट झालेला रस्ता स्वच्छ करत होते.
 
हा रस्ता मध्यरात्रीच्या वेळेस शहरात घडलेल्या घटनेचा साक्षीदार होता.
 
रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच मुस्लीम तरुणही मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कडेला उभं राहून स्वच्छतेचं चाललेलं काम बघत होते.
 
रस्त्यावर नजर टाकली तर दोन्ही बाजूची दुकानं बंद असल्याचं दिसून आलं. तसंच रस्त्यावरील लाईटची तोडफोड केल्याचं स्पष्ट दिसत होतं.
 
नेमकं काय घडलं?
संभाजीनगरमध्ये 29 मार्चच्या मध्यरात्री दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचं पर्यवसान दगडफेक आणि नंतर जाळपोळ करण्यात झालं.
 
नेमकं घडलं काय, याविषयी बंदोबस्तासाठी आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं सांगितलं, “29 मार्चच्या मध्यरात्री रामनवमीच्या तयारीसाठी काही तरुण इथं जमले होते. त्यांनी फटाके फोडले. ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. मग तरुणांच्या दुसऱ्या गटानं येऊन ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्या. आधी 10 तरुण होते. मग 30 ते मग 30 ते 40 जण जमा झाले. मग दगडफेकीला सुरुवात झाली आणि पुढे हे प्रकरण पांगलं.”
 
जमावानं पोलिसांच्या 10 पेक्षा अधिक गाड्या जाळल्याचं, त्यांची तोडफोड केल्याचंही त्यांनी सागितलं.
 
सकाळी 9 च्या सुमारास यापैकी काही गाड्या राम मंदिर परिसरातून उचलून नेण्याचं काम चालू होतं.
 
परिसरात फिरल्यानंतर आम्ही राम मंदिरात पाहोचलो. तेव्हा अनेक जण तिथं दर्शनासाठी आल्याचं दिसून आलं. आतमध्ये भजनाचा कार्यक्रमसुद्धा सुरू होता.
 
इथं माझी भेट स्थानिक पत्रकारांशी झाली.
 
“हा पूर्ण मुस्लीमबहुल भाग आहे. रामनवमीच्या दिवशी मुस्लिम बांधव मंदिराबाहेर शरबत वाटतात. दोन-चार उपद्रवी लोकांमुळे हे असं होतं. या परिसरात अशी घटना याआधी कधीच घडली नाही,” असं त्यांच्या बोलण्यातून समोर आलं.
 
यानंतर मी मंदिरातून बाहेर पडलो आणि स्थानिकांशी संवाद साधायला सुरुवात केली.
 
'तिकडे जाऊ नका, भीती वाटतेय'
मंदिरापासून चालत चालत अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर मोहम्मद शफुउद्दीन आणि नवाब खान एकमेकांशी चर्चा करत असल्याचे दिसले.
 
मोहम्मद शफुउद्दीन (60) यांना घटनेविषयी विचारल्यावर ते म्हणाले, “जे काही झालं ते चुकीचं आहे. यासांरख्या घटनांमुळे दोन्ही समाजाला त्रास होतो. आधीच लॉकडाऊनमुळे धंदे बंद होते. कालच्या घटनेनं पुन्हा दुकानं बंद करावी लागलीय.”
 
मोहम्मद यांचं राम मंदिराच्या गल्लीतच फॅब्रिकेशनचं दुकान आहे. 29 मार्चच्या रात्री झालेल्या घटनेमुळे त्यांना 30 मार्च रोजी दुकान बंद ठेवावं लागलं होतं. ते त्यांच्या दुकानासमोर उभे राहून आमच्याशी संवाद साधत होते.
 
ते पुढे म्हणाले, “हिंदू, मारवाडी, गुजराती या सगळ्या समाजातले लोक आमचे ग्राहक आहेत. मला वाटतं, तरुणांनी कुणाच्याही भाषणांना, चिथावणीला बळी पडू नये.”
 
"दंगल झाल्यामुळे घरुन दुकानाकडे यायला निघालो तेव्हा माझी मुलगी मला म्हणाली की, तिकडे जाऊ नका. भीती वाटतेय,” असंही ते म्हणाले.
 
मोहम्मद यांचा मुलगा दुकानातील सामान व्यवस्थित आहे की, ते पाहायला आला होता.
 
बीबीसीसोबत बोलताना तो म्हणाला, “माझ्या लहानपणापासून म्हणजे 31 वर्षांपासून असं कधीच इथं झालं नाही.”
 
मोहम्मद यांच्यासोबत नवाब खानही (75) होते. त्यांचंही याच परिसरात रेती-खडीचं दुकान आहे.
 
ते म्हणाले, “कोणत्याही समाजानं असं करू नये. यामुळे दोन्ही समाजाचं नुकसान होतं. आज आमचा एक-दीड हजार रुपयांचा धंदा झाला असता. तो या दंग्यांमुळे झाला नाही. नुकसानंच झालं.”
 
राम मंदिराकडे परत आलो तेव्हा मंदिराच्या पायथ्याशीच प्रकाश काथार फुलं विकण्यासाठी बसलेले असल्याचं दिसलं. ते 25-30 वर्षांपासून नियमितपणे इथं फुलं विकतात.
 
या घटनेविषयी विचारल्यावर ते म्हणाले, “मला माहितीही नव्हतं असं काही झालं म्हणून. व्हॉट्सअपवर माहिती पडलं. पण, सध्या तरी फुलांच्या विक्रीवर काही परिणाम झालेला नाहीये. आता कुठं लोक दर्शनाला यायला लागलेत.”
दरम्यान, एव्हाना सकाळचे 11 वाजले होते. तरुणांचा एक मोठा गट मोटारसायकलवरुन आला.
 
ते ‘जय श्रीराम’, ‘संभाजी महाराज की जय’, अशा घोषणा देत होते. मोठमोठ्यानं वाजणाऱ्या गाडीच्या हॉर्नमुळे आपसूकच त्यांच्याकडे लक्ष जात होतं.
 
त्यांच्या या घोषणा पाहून समोरच्या गल्लीतले मुस्लीम तरुणही एकत्र आले आणि रस्त्यावर त्यांनी गर्दी केली.
 
‘ही घटना दिमाखाच्या बाहेर’
सकाळी 9 वाजल्यापासूनच ते दुपारी 12 वाजेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांनी मंदिरात यायला सुरुवात केली. प्रत्येकानं माध्यमांशी संवाद साधत अफवांना बळी न पडण्याचं आवाहन केलं. नेत्यांची गाडी आली रस्त्यावरील जमाव गर्दी करून त्यांना पाहण्यासाठी उत्सुक असलेला दिसत होता.
 
दरम्यानच्या काळात मंदिराबाहेर माझी भेट झाली नारायण दळवे यांच्याशी झाली.
 
ते म्हणाले, "या पूर्ण भागात हे एवढंच एक राम मंदिर आहे. इथं हिंदू नाहीच, सगळे मुसलमान आहेत. इथं दरवर्षी रामनवमीला मुस्लीम बांधव शरबत वाटतात. यात्रेत सहभागी होऊन पाणी वाटतात. हिंदू-मुस्लिम एकोप्यानं राहतात. पण, यंदा हे असं कसं काय घडलं माहिती नाही. दिमाखाच्या बाहेर आहे हे सगळं.”
 
नामांतराच्या राजकारणामुळे हे घडलं का असं विचारल्यावर ते म्हणाले, “मी त्यावर नाही बोलू शकत.”
 
दीड वाजताच्या सुमारास शेजारील मशिदीतून नमाज पठणाचा आवाज ऐकू येत होता. त्याचवेळी दुसरीकडे अनेक जण राम मंदिरात दर्शनासाठी जात होते.
 
याच वेळी स्नेहलता खरात मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडल्या होत्या. त्या शहरातील बीड बायपास या भागात राहतात. त्या गेल्या 15 वर्षांपासून याच राम मंदिरात कीर्तन करतात.
 
त्या म्हणाल्या, “जे झालं ते चूक आहे. काही समाजकंटक लोक हे करतात. यामुळे आज त्यांच्याही (मुसलमान) भागात तणाव आहे. हा असा प्रकार कोणत्याही समाजाला आवडत नाही.”
 
शहराच्या नामांतरामुळे हे झालं असं वाटतं का, यावर त्या म्हणाल्या, “नामांतरामुळेही ही घटना झालेली असू शकते. पण दहशतवादाला, गुंडागर्दीला कोणताही धर्म नसतो.”
 
इथं जाळपोळ झाली, हे दर्शनाला यायच्या आधी माहिती होतं का, असं विचारल्यावर त्यांनी ‘हो’ असं उत्तर दिलं.
 
मग भीती नाही का वाटली, यावर त्यांच्या शेजारी उभी असलेली एक महिला म्हणाली, “भीती कशाची? आमच्याही पायात चप्पल आहेच की. आमचे मुलं आम्हाला म्हटले की, बिनधास्त दर्शनाला जा.”
 
दुपारच्या काळात अनेकांनी मंदिरात येऊन दर्शन घेतलं. मंदिराच्या बाहेर मुस्लीम बांधव सरबत वाटत होते.
 
संध्याकाळी पाचच्या सुमारास या राम मंदिरातून शोभा यात्रा निघणार होती. यात्रा निघताना मुस्लीम बांधवांनीही यात्रेत सहभाग नोंदवला.
 
मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही शोभायात्रा निघाली. राज्यातील पोलिस दलासोबतच केंद्रीय राखीव पोलिस दलाचे कर्मचाराही यावेळी रस्त्यावर हातात बंदुका घेऊन तैनात होते.
 
'जे झाले ते चूकच होतं,' अशीच भावना प्रत्येकाच्या बोलण्यातून समोर येत होती.
 
रात्री साडेसातच्या सुमारास शोभायात्रा परत राम मंदिरात पोहचली. ज्या किराडपुरा भागात ही घटना घडली, तिथून यात्रा जात असताना त्यावेळी रस्त्यावर मुस्लीम बांधव दिसून आले नाही.
 
ते आपापल्या घराच्या खिडकीतून, गच्चीवरून यात्रा पाहत होते. काही जण गल्लीत आतमध्ये उभे राहून यात्रा पाहत होते.
 
यात्रा मंदिरात पोहोचली. सगळं काही शांततेत पार पडलं म्हणून पत्रकार बांधवांनीही मोकळा श्वास घेतला होता.
 
मंदिरातून बाहेर पडताना एक पत्रकार मित्र भेटले. “ही दंगल पूर्वनियोजित होती का, असा प्रश्न आहे,”असं ते म्हणाले.
 
असं तुम्हाला का वाटतं, असा प्रतिप्रश्न मी त्यांना केला. त्यावर ते म्हणाले, “वरती पाहा. मंदिराच्या मंडपावर अजूनही दगड दिसतील.”
 
वरती पाहिल्यानंतर मंडपावर तीन-चार दगड असल्याचं दिसलं.
 
तर ते पत्रकार पुढे म्हणाले, “सकाळी महापालिकेचे कर्मचारी ही जागा स्वच्छ करायला आले तेव्हा ट्रॅक्टरभर दगड निघाले. एवढे दगड आले कुठून? इथं शेजारी तर काही बांधकाम सुरू नाहीये.”
 
नामांतराच्या वादाचं पर्यवसान दंगलीत?
संभाजीनगरच्या इतिहासात आतापर्यंत कधीच रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडली नसल्याचं सगळेच जण सांगत होते.
 
त्यामुळे मग आताच ही घटना का घडली, हा प्रश्न कायम आहे. याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आधी गेल्या काही दिवसांमधील शहराचं वातावरम कसं होतं, ते पाहावं लागेल.
 
केंद्र सरकारनं औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर मुस्लीम समाजानं त्यावर नाराजी व्यक्त केली.
 
खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराविरोधात साखळी उपोषण केलं. त्यांच्या नेतृत्वात हजारे मुस्लीम बांधवांनी कँडल मार्चही काढला. शहराचं नाव औरंगाबाद हे कायम ठेवावं, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
 
याच काळात नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू समाजाचा शहरात मोठा मोर्चा निघाला. या मोर्चाचं कारण देत जलील यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं.
 
नामांतराचा मुद्दा हा शहरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. नामांतरास आक्षेप नोंदवण्यासाठी 27 मार्च, सोमवार हा अखेरचा दिवस होता.
या दिवसापर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ एकूण अर्जांची संख्या 4 लाख 3 हजार 15, तर विरोधात 2 लाख 73 हजार 210 हरकती आल्या आहेत. हिंदुत्ववादी पक्ष, संघटना आणि एमआयएम असं दोन्ही बाजूनं अर्ज भरून घेण्यासाठी शहरात प्रयत्न केले गेले.
 
त्यामुळे मग नामांतरामुळे वाद पेटून त्याचं पर्यवसान दंगलीत झालं का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
 
याचं उत्तर देताना संभाजीनगरमधील ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे सांगतात, “रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंतच्या इतिहास शहरात असं कधीच घडलं नव्हतं. शहराचं नाव बदलावं अशी मागणी नव्हती आणि त्यासाठी तेवढं मोठं आंदोलनंही झालं नव्हतं. सवंग लोकप्रियतेसाठी हे नाव बदलण्यात आलं आणि त्यामुळे मग शांत असलेले लोक चिडले. त्यानंतर पुढे हा प्रकार घडला.”
 
तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयदेव डोळे यांच्या मते, “शहराचं नाव औरंगाबाद असताना गेल्या 30 ते 35 वर्षांपासून आम्हाला संभाजीनगर हे अंगवळणी पडलंय. त्यामुळे शहराचं अधिकृत नामांतर झाल्यानंतरही हवा तसा उत्साह जाणवला नाही. त्यामुळे घडला प्रकार लोकसभा आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चालल्याचं मला दिसतंय.”