दोन्ही महापौरांशी चर्चा करुन जमावबंदीचा निर्णय घ्यावा : अजित पवार
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात पुन्हा जमावबंदी आदेश लागू करण्यासंबदर्भात चर्चा सुरु आहेत. यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला.
पवार म्हणाले, शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. 'कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने काम करावे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत अशी सूचना त्यांनी केली.