मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑगस्ट 2020 (08:24 IST)

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पवार कुटुंबीय यांच्यात कोणताही वाद नाही

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली होती. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. यावेळी जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
 
“या बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ही बैठक पूर्वनियोजित होती,” असं पाटील म्हणाले. “राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पवार कुटुंबीय यांच्यात कोणताही वाद नाही. शरद पवार आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि वडिलांच्या नात्यानं ते आम्हाला सल्ले आणि सूचना करत असतात. आम्हाला त्यांचं मार्गदर्शनही मिळत असतं,” असंही त्यांनी नमूद केलं.
 
“पार्थ पवार यांच्याकडून पक्षाला कोणतंही स्पष्टीकरण मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यांनी कोणतीही मागणी केली असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला पक्षाशी जोडण्याची गरज नाही,” असंही पाटील यांनी सांगितल.