सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 जून 2023 (15:41 IST)

लातूर सोयाबीन हब .. विशेष लेख

सोयाबीनच्या उत्पादनात लातूर जिल्ह्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो. एकेकाळचा कापूस, उडीद पट्टा असलेला हा जिल्हा गेल्या दीड दशकात ‘सोयाबीन हब’ बनला आहे. लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन वाढण्यामागची कारणं, सोयाबीन बियाण्याची उपलब्धता… सोयाबीन उत्पादन वाढीसाठीचे उपाय, खताची मात्रा… या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा यासंदर्भात घेतलेला हा आढावा…!!
 
सोयाबीन ही मूळातील पूर्व आशियातील कडधान्य गटातील वनस्पती आहे. सोयाबीनमध्ये ग्लासीन हे आमिनो आम्ल मोठ्या प्रमाणात असते, म्हणूनच याचे शास्त्रीय नाव ग्लासीन मॅक्स असे आहे. सोयाबीन हे कडधान्य असले तरी त्याच्यापासून मिळणाऱ्या तेलामुळे हे पीक ढोबळ अर्थाने तेलबियांमध्येही गणले जाते. या अशा सोयाबीनवर वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्रात अत्यंत चांगले काम सुरु आहे. तेथील संशोधक प्रा. डॉ. अरुण गुट्टे यांना लातूर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादन घेण्यामागे काय कारण आहे, हे विचारले असता ते सांगतात की, ‘लातूर जिल्ह्यातील माती आणि हवामान सोयाबीन पिकासाठी अत्यंत पूरक आहे. सोयाबीन उत्पादनासाठी 700 मिलीमीटर पाऊस आवश्यक असतो. लातूर जिल्ह्यातील पावसाची सरासरी 750 ते 800 मिलीमीटर आहे. त्याचबरोबर सोयाबीनवर प्रक्रिया करणारे मोठे उद्योग लातूरमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला आहे. सोयाबीन तेल कंपन्यांना जवळ कच्चा माल उपलब्ध होतो, वाहतूक खर्च वगैरे कमी होत असल्यामुळे क्विंटलला चांगला भाव देता येतो. सोयाबीन पीक हमखास नगदी पैसे देणारे पीक आहे. त्यामुळे दिवसेंदिवस लातूर जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्र वाढताना दिसत आहे.’
 
सोयाबीन पेरा आणि बियाणे उपलब्धता
 
लातूर जिल्ह्यातील शेतीयोग्य क्षेत्र आहे 5 लाख 99 हजार 900 हेक्टर. त्यात सोयाबीन क्षेत्र 2012 मध्ये फक्त 2 लाख हेक्टर होते, आता 2023 साठी अंदाजे 4 लाख 90 हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पेरा होणार आहे. यासाठी 3 लाख 67 हजार 500 क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज आहे. लातूर जिल्ह्यात महाबीज आणि इतर कंपन्यांचे 1 लाख 28 हजार 625 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. कृषि विभागाने शेतकऱ्यांनी घरीच सोयाबीन बियाणे उत्पादन करावे, यासाठी प्रोत्साहन दिले त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास 2 लाख 68 हजार 875 क्विंटल एवढे बियाणे शेतकऱ्यांनी घरी तयार केले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी दिली.
 
शेतकरी गट बियाणे उत्पादक कंपनीला शासनाची मदत
 
लातूर जिल्ह्यात जवळपास 70 छोट्या-छोट्या कंपन्या सोयाबीन बियाणे निर्मिती करतात. लातूर तालुक्यातील खंडापूर येथील अॅटग्रोटेक अॅ्ग्रो प्रोड्यूसर कंपनी ही त्यातील एक प्रमुख कंपनी. या कंपनीला भेट दिल्यानंतर या शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनंत गायकवाड यांनी अत्यंत सखोल माहिती दिली.
 
“शेतकऱ्यांना लागणाऱ्या बियाण्याची उपलब्धता बियाणे कंपन्या पूर्ण करू शकत नाहीत हे लक्षात आल्यानंतर कृषि विभागातली नोकरी सोडून, इतर 500 शेतकऱ्यांना एकत्र करून 2016 मध्ये बियाणे उत्पादन कंपनी सुरु केली. त्याला शासनाने मोठी मदत केली, त्यात प्रामुख्याने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) 56 लाख रुपये अर्थसहाय्य मिळाले, या रक्कमेतून एक सुसज्ज गोडावून बांधले, बियाणे ग्रेडिंग मशीन आणि गोडावूनसाठी 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च आला. यासाठी 60 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. गळीत धान्य विकास कार्यक्रमांतर्गत 12 लाख 50 हजार अनुदान प्राप्त झाले, त्यातून तिसरे गोडाऊन बांधले. त्यातून ही पावणेदोन एकरवर कंपनी उभी राहिली. शासनाची मदत नसती तर एवढी मोठी कंपनी उभं करणं शक्य नव्हतं, असे श्री. गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
 
2018 ला 400 एकर क्षेत्रावर बियाणे घेणारी ही कंपनी आज घडीला जवळपास तीन हजार एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांना ब्रीडर बियाणे देवून प्रमाणित बियाणे तयार करते आहे. या सर्व शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिकचा 500 रुपये दिला जातो. सर्व प्रकिया करून यावर्षी 11 हजार 600 क्विंटल बियाणे प्रामाणिकरणासाठी ठेवले होते, पैकी 5 हजार 700 क्विंटल बियाणे शासनाच्या कृषि विभागाकडून प्रमाणित करण्यात आले. यामधील जे अप्रामाणित बियाणे झाले आहे, ते पूर्णपणे मिलवर प्रक्रिया करण्यासाठी आमच्याकडून विकले जाते. अप्रमाणित झालेल्या बियाण्यासाठीही आम्ही शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा 300 रुपये अधिकचे देतो. शेतकऱ्यांची कंपनी आणि शेतकऱ्याच्या हिताचेच काम करत असल्याचा निर्वाळा गायकवाड यांनी यावेळी दिला.
 
बियाणे तयार करण्याची प्रक्रिया
महाबीज असो वा इतर खाजगी बियाणे कंपनींना मूळ ब्रीडर बियाणे कृषि विद्यापीठ संशोधन केंद्राकडूनच मिळते. मग त्या बियाण्याचा विविध शेतकऱ्यांच्या प्लॉटवर पेरा करून मूलभूत बियाणे बनविले जाते. मग त्या मूलभूत बियाण्याच्या पेऱ्यापासून प्रमाणित बियाणे तयार होते. या प्रत्येक बियाण्यासाठी वेगवेगळे सील असतात, त्यात ब्रीडरसाठी पिवळा टॅग, पायाभूतसाठी पांढरा टॅग आणि प्रमाणितसाठी निळा टॅग वापरला जातो. यातल्या थेट शेतकऱ्यांना बियाणे म्हणून विकायला दिल्या जाणाऱ्या प्रमाणित बॅगच्या प्रत्येक टॅगवर कृषि अधिकाऱ्यांची सही असते. तेच बियाणे प्रमाणित असते, अशी माहितीही श्री. गायकवाड यांनी दिली.
 
माती परीक्षण अत्यंत गरजेचे
 
मातीतील सर्वात महत्वाचे अन्न घटक म्हणजे एन.पी. के अर्थात नत्र (नायट्रोजन), स्फूरद (फॉस्फरस) आणि पालाश (पोटॅश). हे घटक आपल्या शेतीतल्या मातीत असावे लागतात. समजा तुम्हाला सोयाबीन पेरायचं आहे तर सोयाबीनला 30-60-30 असा एन. पी. के. ची मात्रा द्यावी लागते. समजा तुम्ही माती परीक्षण केले आणि जमिनीत 15 नत्र आहे तर 30 च्या ऐवजी 15 ची मात्रा देता येते. हे तिन्ही अन्न घटकाला लागू आहे. उदाहरण म्हणून जर घेतलं तर ऊसाला 250-125-125 ही मात्रा लागते. ऊसाचे उत्पादन वाढावे म्हणून जर यापेक्षा अधिकचा मात्रा दिली तर मातीचे आरोग्य धोक्यात येते. जमीन नापीक होण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रत्येक तीन वर्षातून एकदा शेतात कंपोस्ट खत टाकणे गरजेचे आहे, अशी माहिती आम्ही शेतकऱ्यांना देतो. पण माती परीक्षण करण्याकडे शेतकऱ्यांचा फारसा कल नाही. माणसाच्या शरीरात बिघाड झाला तर त्याचे निदान करण्यासाठी जसे रक्ताचे नमुने गरजेचे आहेत, तेवढच महत्व जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षणाचे महत्व आहे. त्यामुळे जोपर्यंत माती परीक्षण करून शेतकरी पीक घेणार नाही, तोपर्यंत हवा तसा उतारा मिळणे अवघड असल्याचे श्री. गायकवाड सांगतात.
 
लातूरच्या सोयाबीन उत्पादन, सोयाबीनवर प्रक्रिया करणारे उद्योग लक्षात घेऊन शासनाने मागे लातूरमध्ये सोयाबीन परिषद घेतली होती, त्याचा उत्तम परिणाम झाला. कोविडच्या काळामध्ये ही परिषद घेणे शक्य झाले नसल्याने यावर्षी ऑगस्टमध्ये आपण पुढाकार घेऊन सोयाबीन परिषद घेणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी लातूर दौऱ्यावर आले असताना सांगितले होते. सोयाबीन उत्पादन ते प्रक्रिया उद्योगात लातूरचा क्रमांक वरचा आहे. शासन यात अधिकाधिक सुधारणा करत आहे. आतापर्यंत लातूरच्या तेलबिया संशोधन केंद्राने सोयाबीनचे 7 ते 8 वाण विकसित केले आहे. यावर्षी MAUS-725 हे नवे वाण विकसित केले आहे. प्रमाणित बियाणे तयार करण्यासाठी महाबीजला ब्रीडर बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे, अशी माहिती संशोधक प्रा. डॉ. अरुण गुट्टे यांनी यावेळी दिली. तसेच हे वाण अधिक उत्पन्नासाठी निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.
 
कृषिला उत्तम दिवस येण्यासाठी अधिकाधिक प्रक्रिया उद्योग लातूरमध्ये उभे करण्याकडे शासनाचा कल आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. त्यामुळे येत्या काळात शेतीला सुगीचे दिवस येतील हे मात्र निश्चित.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor