सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (09:19 IST)

महाराष्ट्र पाऊस : पोलादपुरात दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू, 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

फोटो साभार -सोशल मीडिया 
रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील सुतारवाडी परिसरात दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमनं ही माहिती दिली.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, पाच लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
 
तर एएनआयच्या वृत्तानुसार, महाड तालुक्यात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. महाड तालुक्यातील कलाई या गावात दरड कोसळल्याची माहिती एएनआयनं दिलीय. या दुर्घटनेमुळे किती नुकसान झालंय, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
 
एएनआय या वृत्तसंस्थेनं रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबत माहिती दिल्याचे सांगितले आहे.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या माहितीनुसार, एनडीआरएफच्या पथकाला या घटनेबाबत माहिती दिली आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात महाड तालुक्यात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास प्रशासनाला अडथळा येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
दुसरीकडे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे मदतची मागणी केलीय. महाडमध्ये पावसाच्या पाण्यात अडकलेल्यांच्या मदतीसाठी लष्कराच्या मदतीची मागणी करण्यात आलीय.
 
पुरामुळे घटनास्थळी पोहोचण्यात अडथळा
मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेत. त्यामुळे NDRF च्या पथकांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा येतोय, अशीही माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
 
रात्री एक वाजताच्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील कुंडलिका आणि सावित्री या दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.कुंडलिका नदी प्रामुख्यानं रोहा तालुक्यातून, तर सावित्री नदी प्रामुख्यानं महाडमधून वाहते.

NDRF कडून नागरिकांना सुखरूप वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल,आमची पथकं घटनास्थळी पोहोचत आहेत, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक सत्य नारायण प्रधान यांनी दिली. त्यांनी तसं ट्वीट केलं आहे.
 
कालपासून (22 जुलै) रायगड,रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला अशा विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. कोकणात चिपळूण आणि खेड परिसरात पुराचा तडाखा बसला असून रायगडमधील महाड-पोलादपूर भागात मोठा फटका बसला आहे.
 
मुसळधार पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन सतर्क झाले आहे. NDRF ची 9 पथके रवाना करण्यात आली आहेत. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी NDRF आणि हवाई मार्गाने बचाव कार्य सुरू झाले आहे.


चिपळूण आणि खेडमधील स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड शहरामध्ये पुराचा पाणी शिरलं आहे. भरती आणि अतिवृष्टीची वेळ एकत्र आल्यामुळे खेड आणि चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर झाली. अनेक लोक अपार्टमेंटमध्ये अडकले आहेत.
 
* बचाव कार्यासाठी सध्या खाजगी 6, कस्टम 1, पोलीस 1, नगरपरिषद 2, तहसील कार्यालयाच्या 5 बोटी मदत करत आहेत.
* हवाई दलाचे दोन हॅलिकॉप्टर तैनात असून हवामान अनुकूल झाल्यास हॅलिकॉप्टरद्वारे तात्काळ बचावकार्य करण्यात येणार आहे.
* नौदलालाही मदतीसाठी विंनती करण्यात आली असून त्यांची टिम लवकरात लवकर पोहोचेल असं सांगण्यात येत आहे.
* एनडीआरएफचे 5 बोटींसह 23 जणांचे पथक चिपळूण येथे पोहोचत आहे. रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे 12 जणांचे पथक रस्सी, लाईफ जॅकेटसह बचाव कार्यासाठी चिपळूण येथे हजर आहे. 'राजू काकडे हेल्प फाऊंडेशन' चे 10 जणांचे पथक खेड व चिपळूण येथे पोहोचत आहे. जिद्दी माऊंटेनिअर्सचे पथकही बचावकार्यासाठी पोहोचत आहे.
* प्रशासनाकडून ट्रकद्वारे रत्नागिरीहून 2, दापोलीहून 2, गुहागरवरुन 2 बोटी चिपळूणकडे बचावकार्यासाठी रवाना झाल्या आहेत.
* आतापर्यंत पुरामध्ये अडकलेल्या सुमारे 100 नागरिकांची सुटका करण्यात आली असून पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर आलेल्या नागरिकांसाठी चिपळूण व सावर्डे येथील शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.
* चिपळूणच्या आजूबाजूची 7 गावं पुराच्या पाण्याखाली असून सदर गावातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफ व बचाव पथकाद्वारे सुरु आहे.
* सद्यस्थितीमध्ये चिपळूण व खेड तालुक्यात कोणतीही मनुष्यहानी नाही. परशुराम घाट तसेच मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी असल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
* खारेपाटण येथील रस्त्यावर पुराच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
* भरती साधारण रात्री 11 वाजता सुरु होणार असल्याने सद्यस्थितीत पुराखाली नसलेल्या भागांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.


पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. केंद्राकडून आवश्यक मदत पुरवण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं आहे.
 
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग
कोयना धरणामधून आज (23 जुलै 2021) सकाळी 8 वाजता सांडव्यावरुन 9567 क्युसेक्स विसर्ग (2 फुट) आणि पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक्स असा एकूण 11667 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
 
तर सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 50000 क्युसेक(5 फुट) इतका करण्यात येणार आहे.