समुपदेशनासाठी आलेल्या मायलेकींनी महिला पोलिसांनाच केली मारहाण;
समुपदेशनासाठी आलेल्या मायलेकींनी महिला पोलिसांना मारहाण केल्याची घटना महिला सुरक्षा विभागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. महिला सुरक्षा विभागात कार्यरत असणाऱ्या ज्योती तुकाराम आमणे यांनी या घटनेची तक्रार दिली आहे. महिला पोलिसांना मारहाण करणा-यांची नावे प्राजक्ता योगेश नागरगोजे (रा. पी २४, स्वाध्याय केंद्रासमोर, पाटीलनगर, त्रिमुर्ती चौक, सिडको,नाशिक ) व सरला बोडके अशी आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंगापूर रोडवरील महिला सुरक्षा विभागात समुपदेशन सुरु असताना या दोघींनी महिला कर्मचाऱ्यांना प्रथम शिवीगाळ केली. त्यानंतर आमणे यांना बोचकारण्यात आले. तर सरला बोडके हिने हाताच्या कोपऱ्याने पाठीत मारले. या घटनेनंतर प्राजक्ता नागरगोजे व सरला बोडके यांच्याविरुद्ध भादंवि कायदा कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक भोये तपास करत आहे.