शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जून 2018 (17:20 IST)

मुंबईची तुंबई होते, मुंबई महानगरपालिकेचे काम आहे तरी कुठे ?

- राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांचा सवाल
 
मुंबईत कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत आज सकाळी अनेक भागात पाणी साचले होते. परिणामी मुंबईकरांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे मुंबईची तुंबई होत असेल तर मान्सूनसाठी सज्ज असण्याचा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे काम आहे तरी कुठे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी उपस्थित केला आहे.
 
पुढे बोलताना राखी जाधव म्हणाल्या की मुंबई महानगरपालिकेचे अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. रेल्वेरुळालगतचा कचरा साफ करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे, मात्र रेल्वे प्रशासान आणि पालिका प्रशासन ही जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहे. अशामध्ये मुंबईत पाणी तुंबण्याला जबाबदार कोण आहे असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला.
 
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत कुठेच पाणी साचले नसल्याचा अजब दावा केला आहे त्याला उत्तर देताना राखी जाधव म्हणाल्या की मुंबई पाणी साचले की नाही याचे उत्तर जनताच सत्ताधाऱ्यांना देईल.