शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (18:29 IST)

नरेंद्र मोदी : 'शरद पवारांनी दाऊदपासून मुंबईला वाचवलं' असं मोदी खरचं म्हणाले होते का?

महाराष्ट्राच्या राजकारणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आलाय. भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे दाऊदशी संबंध असल्याचा थेट आरोप केला.
 
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल केलाच. मात्र, त्याचसोबत अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांबाबतचा एक व्हीडिओही सोशल मीडियावर शेअर केला.
 
या व्हीडिओत नरेंद्र मोदी म्हणतात की, "शरद पवारांनी मुंबईला दाऊदपासून वाचवलं."
शरद पवारांनी मुंबईला दाऊदपासून वाचवलं, असं नरेंद्र मोदी खरंच म्हणाले का? आम्ही या व्हीडिओमागची सत्यता पडताळून पाहिली.
 
नरेंद्र मोदी पवारांबाबत काय म्हणाले होते?
महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
नरेंद्र मोदींच्या या व्हीडिओची सत्यता पडताळून घेण्याआधी ते नेमकं काय म्हणाले होते, हे जाणून घेऊ.
 
या व्हीडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत घडलेल्या घटनांचा गुजरातमध्ये लगेच कसा परिणाम होतो, यावर बोलताना दिसून येत आहेत. नरेंद्र मोदी बोलताना व्यासपीठावर शरद पवार आणि प्रतिभा पवारही उपस्थित असल्याचं दिसून येतंय.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांची एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून स्तुती करतात.
पुढे भाषणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उल्लेख करताना ते म्हणतात, "एकेकाळी अंडरवर्ल्डमुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुंबई अंडरवर्ल्डच्या ताब्यात गेली तर काय होईल? याची चिंता सर्वांना होती. मी म्हणतो, शरदरावांमध्ये हिंमत आणि कौशल्य होतं. त्यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं. मुंबईला बाहेर काढलं."
 
या व्हीडिओमध्ये प्रेक्षकात शिवसेना खासदार अरविंद सावंतही कार्यक्रमाला उपस्थित दिसून येत आहेत.
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेला मोदींचा व्हीडिओ खरा?
एकीकडे भाजप नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत असतानाच, दुसरीकडे दाऊदच्या मुद्यावर शरद पवारांची स्तुती करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
पण सोशल मीडियावर व्हायरल हा व्हीडिओ खरा आहे का? याची सत्यता पडताळून पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत यूट्यूब हॅंडलवर हा व्हीडिओ 12 डिसेंबर 2015 ला म्हणजेच सहा वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आलाय.
 
'शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या उद्घाटनावेळी पंतप्रधानांचं भाषण' असं कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आलंय.
 
2015 मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होते. तर ANI या वृत्तवाहिनीने 10 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांबद्दल केलेलं वक्तव्य ट्वीट केलंय.
या व्हीडिओबाबत आम्ही शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनाही विचारलं. अरविंद सावंत या कार्यक्रमात उपस्थित होते, जिथला हा व्हीडिओ आहे. सावंतांनी यावर अधिकची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "शरद पवारांच्या पंच्यात्तरीचा हा कार्यक्रम होता."
 
पंतप्रधान कार्यालयाच्या यूट्यूब हॅंडरवरूनही 10 डिसेंबर 2015 ला नरेंद्र मोदींचा हा व्हीडिओ अपलोड करण्यात आला आहे.
 
दाऊदच्याशी संबंधावरून भाजपने केलेले आरोप
महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यापासून भाजप महाविकास आघाडी सरकारविरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसून येतेय. एवढंच नव्हे, तर मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर दाऊदशी संबंधावरून आरोप केले होते.
 
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, "नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीकडून जमीन खरेदी केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. असं असूनही उद्धव ठाकरे सरकार मलिक यांचा राजीनामा घेत नाही. उलट अख्ख मंत्रिमंडळ त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर येतं. याचा अर्थ महाविकास आघाडी दाऊदचं समर्थन करते."
 
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने मुंबईत आणि महाराष्ट्रात मोठं आंदोलन केलं होतं.
 
यानंतर माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी थेट शरद पवारांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते, "नवाब मलिक यांचा राजीनामा का घेतला जात नाही. मला असा संशय आहे की पवारांचे दाऊदशी संबंध आहेत."
 
निलेश राणेंचे भाऊ भाजप आमदार नितेश राणे यांनीही या मुद्यावर वादग्रस्त वक्तव्य केलंय. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "सर्व पुरावे नवाब मलिक यांच्या विरोधात असूनही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. हे सरकार दाऊदचं आहे का? मग मंत्र्यांनी आपल्या केबिनमध्ये महात्मा गांधींचे फोटो काढून दाऊदचा फोटो लावावा.
 
"मुंबईत 12 मार्च 1993 ला बॉम्बस्फोट झाले होते. हे स्फोट दाऊदने केल्याचं स्पष्ट झालंय. यावरूनही भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर आरोप केला. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणतात, "उद्धव ठाकरे सरकारमधील एकातरी मंत्र्याला बॉम्बस्फोटातील बळींची आठवण झाली का? दाऊदसंबंधित मालमत्ताखरेदी केलेल्या मंत्र्यावर सत्तेसाठी हे काहीही करू शकत नाही मग यांना 12 मार्च कसं आठवेल."
 
काय म्हणतात राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते?
पंतप्रधानांच्या या व्हीडिओबाबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड ट्विटरवर लिहितात, "अंडरवर्ल्ड आणि शरद पवारांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे काय बोलत आहेत? ज्यांना समजेल त्यांनी वाचावं, बाकिच्यांनी बक-बक चालू ठेवावी."
 
शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेते निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण निलेश राणे अजूनही आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. ते म्हणाले, "माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले, तरी मी म्हणतच राहाणार. मला संशय आहे आणि राहाणारच की पवारसाहेब दाऊदचे व्यक्ती आहेत."
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हीडिओबाबत भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रिया अजून मिळू शकलेली नाही.