गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दापोलीच्या समुद्रकिनार्‍यावर आढळला ऑक्टोपस

दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी या आधी अनेक वेळा दुर्मीळ सागरी जीवांचे दर्शन घडले असतानाच त्यात आता ऑक्योपसचीही भर पडली आहे. तालुक्यातील लाडघर समुद्रकिनारी ऑक्टोपसचे दर्शन स्थानिक लोकांन घडले. यापूर्वी लाडघर समुद्रकिनारी ऑक्टोपस कधीही आढळण्याची नोंद नाही. 
 
ऑक्टोपस हा समुद्री जीव असून, ती समुद्र तळाशी राहणारी प्रजाती आहे. याला मराठीमध्ये अष्टपाद असे म्हणतात. आठ बाहू असणारा ऑक्टोपस हा जलचर प्राणी आहे. ऑक्टोपस वंशामध्ये एकूण लहान मोठ्या 50 जाती आहेत. त्यामध्ये लहानात लहान 2.50 सेमी तर मोठ्यात मोठी 9.7 मीटरची प्रजाती आढळते. हा प्राणी विशेषत: खोल समुद्रात राहत असला तरी तो उथळ भागामध्येही राहू शकतो. स्वसंरक्षण करण्यासाठी ऑक्टोपस शाईसारखा एक द्रव बाहेर टाकत असतो.
 
त्याच्या शरीराची रचना गोलकार, फुगवटा असलेली असते. त्याला डोळे आणि आठ प्रकाराचे लांब हात असतात. हा जगातील महासागरामध्ये रहात असून विशेषत: उबदार आणि उष्ण कटीबंध भागामध्ये राहतो. याला खोल समुद्रातील राक्षसही म्हटले जाते. ऑक्टोपसचे एरवी चित्रपट आणि संग्रालय यामध्येच दर्शन घडते. लाडघर समुद्रकिनारी डॉल्फीन माशांचे अधूमधून दर्शन घडत असते. त्यामुळे येथील समुद्रकिनार्‍याला पर्यटकांची अधिक पसंती आहे. मात्र, या डॉल्फीनबरोबर अन्य दुर्मीळ सागरी जीवांचेही दर्शन घडू लागल्याने लाडघर समुद्रकिनार्‍याला पर्यटनाचा वेगळाच साज चढू लागला आहे.
 
यामुळेच पर्यटकांची पसंती असणारा लाडघर समुद्रकिनार हा पर्यटकांना पर्यटनाची साद घालणारा ठरत आहे. दापोली शहरापासून 7 किमी अंतरावर लाडघर समुद्रकिनारा आहे.