बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (09:42 IST)

आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनींसाठी ऑनलाईन अर्ज

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या तसेच खाजगी आयटीआयमधून शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्तीचा लाभ देण्यात येतो. या योजनेतून २८ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्तीचा लाभ देण्यात येत असून चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनींसाठी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
 
अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना १०० टक्के तर अडीच लाख ते ८ लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ८० टक्के रकमेच्या प्रशिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती केली जाते. या विद्यार्थ्यांना भराव्या लागलेल्या प्रशिक्षण शुल्कामधून शासकीय आयटीआयच्या प्रशिक्षण  शुल्काइतकी रक्कम वगळून उर्वरित रक्कमेची विद्यार्थ्यांना प्रतिपुर्ती केली जाते. त्यामुळे या योजनेतून विविध अभ्यासक्रमानुसार १९ हजार २०० ते २८ हजार ९०० रुपये इतकी रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळते, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
 
या योजनेतून लाभासाठी विद्यार्थ्यांना १० मार्च २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचा मोठ्या प्रमाणात फायदा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना होणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.