रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जानेवारी 2023 (08:18 IST)

नाशिकात विनापरवाना दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई

nashik police
नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी विनापरवाना दारू विक्री करणार्‍यांवर कारवाईची मोहीम सुरू केली असून, त्याअंतर्गत काल ४ विक्रेत्यांवर कारवाई करून मुद्देमाल जप्‍त केला आहे.
 
पहिली कारवाई वडाळा गावात करण्यात आली. आरोपी रवींद्र तुकाराम गोतरणे (वय ३०, रा. वडाळा गाव, नाशिक) हा ७ हजार ३८५ रुपये किमतीच्या प्रिन्स संत्रा व टँगो पंच दारूच्या २११ बाटल्या कोळी वाडा मनपा शाळेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कबजात बाळगताना आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल जप्‍त केला आहे.
 
दुसरी कारवाई भगूर येथे करण्यात आली. आरोपी जनार्दन प्रभाकर साळवे (रा. शिंगवे बहुला, ता. जि. नाशिक) हा काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भगूर-लहवित रोड येथे रेल्वे फाटकाजवळ १ हजार ११० रुपये किमतीच्या टू बर्ग बिअरच्या सहा बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:जवळ बाळगताना मिळून आला. या प्रकरणी पोलीस शिपाई श्याम पाटील यांच्या फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जनार्दन साळवेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.
 
तिसरी कारवाई ही भगूर येथे करण्यात आली. आरोपी शुभम् सुकदेव तनपुरे (वय २३, रा. मु. पो. वडगाव पिंगळा, ता. सिन्नर, जि. नाशिक) हा काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भगूर-लहवित रोडवरील हॉटेल रायबाच्या भिंतीलगत ७४० रुपये किमतीच्या किंगफिशर कंपनीच्या चार बिअरच्या बाटल्या विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळून आला. या प्रकरणी पोलीस शिपाई नितीन करवंदे यांच्या फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपी शुभम् तनपुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जुंद्रे करीत आहेत.
 
चौथी कारवाई पळसेजवळ करण्यात आली. आरोपी बाळू तुलसीराम कडलग (वय २७, रा. क्रांती चौक, पळसे, ता. जि. नाशिक) हा काल सायंकाळच्या सुमारास इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला मोकळ्या जागेत ४९० रुपये किमतीच्या प्रिन्स संत्रा देशी दारूच्या सात बाटल्या व ४५० रुपये किमतीच्या तीन विदेशी दारूच्या बाटल्या असा ९४० रुपये किमतीचा दारूसाठा विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:जवळ बाळगताना आढळून आला. या प्रकरणी पोलीस शिपाई दत्तात्रय वाजे यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपी बाळू कडलग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor