सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (08:28 IST)

निर्बंध आणखी कठोर करणार; राजेश टोपेंनी केले स्पष्ट

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यात मुंबई हे कोरोना रुग्णवाढीचं केंद्रस्थान बनलं आहे. शहराची दैनंदिन रुग्णवाढ २० हजारांवर गेल्यास लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असं विधान महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केलं होतं. सध्याची कोरोना रुग्णवाढ पाहाता मुंबई आता लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र दिसून येत आहे. यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. यात शरद पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला काही सूचना केल्या असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज कोरोना आढावा बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यात ज्या गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो अशा गोष्टींवर याआधीच निर्बंध लावण्यात आले आहेत. पण आणखी कठोर निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यासंदर्भात पवार यांनी सरकारला सुचवल्याचं टोपे यांनी सांगितलं.
राज्यात लॉकडाऊनचा तुर्तास कोणताही विचार नाही
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार सरकारसमोर नाही. रुग्णसंख्या वाढताना दिसत असली तरी एकूण रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण कोणतेही लक्षणं नसलेले रुग्ण आहेत. यात बहुंताश रुग्णसंख्या घरीच क्वारंटाइन असल्याचंही आकडेवारीवरुन दिसून येतं. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही विचार नाही. विकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू संदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे. त्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असंही राजेश टोपे म्हणाले.
 
मुंबई लोकल बंद करण्याचा विचार नाही
मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली तरी कोणतीही लक्षणं नसलेल्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे लोकल बंद करण्यासंदर्भात आज कोणतीही चर्चा झालेली नाही, असं राजेश टोपे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रोज सकाळी ७ वाजता कोरोना संदर्भात फोनवरुन चर्चा करतच असतात. संपूर्ण परिस्थितीवर ते लक्ष ठेवून असतात. आज फक्त निर्णयांची अंमलबजावणी कशी सुरू आहे आणि आणखी काय करता येईल याबाबतचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.