बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2020 (16:13 IST)

एकादशीच्या सोहळ्यासाठी पादुका एसटी बसने निघणार

देहू येथून जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला एसटी बसने नेण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. एसटी बसमध्ये २० जणांना बसण्याची परवानगी असून फिजिकल डिस्टसिंग पाळले जाणार आहे. दोन्ही संतांच्या पादुका या पारंपरिक रस्त्याने ३० जून रोजी दशमीला मार्गस्थ होणार आहेत. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी यासंदर्भात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत.
 
करोना विषाणूच्या संकटामुळे या वर्षीचा पालखी सोहळा अगदी सध्या पद्धतीने होत आहे. पुणे जिल्ह्यातून संतांच्या पादुकांना अटी आणि कार्यपद्धती अवलंबून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी तर संत तुकाराम महाराज संस्थान, देहु तसेच संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड आणि चांगावटेश्वर देवस्थान, सासवड यांना पंढरपूर येथे पादुका घेऊन जाण्यास परवानगी मिळालेली आहे.
 
असे आहेत नियम 
 
पादुकांसोबत बसमध्ये २० व्यक्तींना जाण्याची परवानगी दिलेली असून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना जाता येणार नाही. पादुकांसोबत जाणाऱ्या व्यक्तींची कोविड टेस्टही करण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्याबाबतचे आदेशही विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. संतांच्या पादुका असलेले वाहन प्रवासात कोठेही दर्शनासाठी थांबवण्यात येणार नाही.