शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 मे 2021 (18:34 IST)

पंढरपूर पोटनिवडणूक निकाल : समाधान आवताडे यांनी भागीरथ भालके यांचा केला पराभव

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांचा 3,503 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भागीरथ भालके यांचा पराभव केला आहे.
 
समाधान आवताडे यांनी विजयानंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं,"हा विजय जनतेचा आहे. लोकांची ताकद पाठीशी होती. आता मतदारसंघाचा विकास हाच ध्यास असणार आहे. मतदारसंघातल्या 35 गावांचा प्रश्न सोडवणार आहे."
 
ते पुढे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस जे सांगतात ते नक्कीच करतात. इथल्या पाण्याच्या प्रश्नातल्या त्रुटी निघाल्या पाहिजेत. उजणीचं पाणी पळवून जात असेल, तर या मतदारसंघात बारमाही पाणी कसं देणार. सर्वप्रथम उजणीत पाणी आणण्याचं काम करावं लागेल."
 
या विजयानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले, "महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी कारभाराला आरसा दाखवण्याचं काम पंढरपूरच्या जनतेनं केलय. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं साम-दाम-दंड-भेद यांचा वापर केला, तरीही जनतेनं भाजपला निवडून दिलंय. मी जनतेचे आभार मानतो."
 
योग्य वेळ आली की महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्यावर मी ठाम आहे, पण आजची लढाई कोरोनाशी आहे, असंही फडणवीस पुढे म्हणाले.
 
पंढरपूरमध्ये पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे भागीरथ भालके आघाडीवर होते. पण नंतर आवताडे यांनी मुसंडी मारली.
 
मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीत भगीरथ भालके यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या सहा फेऱ्यांची मतमोजणी होईपर्यंत भालके आवताडे यांच्यापेक्षा पुढे होते. पण भालके यांच्या मतांची आघाडी शंभर-दोनशेच्याच घरात होती.
 
पण, सहाव्या फेरीनंतर समाधान आवताडे यांनी मतमोजणीत मुसंडी घेतली. सहाव्या फेरीपासून आवताडे हेच आघाडीवर होते.
 
पंढरपूर पोटनिवडणुकीत 524 मतदान केंद्रांवर मतदान झालं. यामध्ये 2 लाख 34 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
 
पंढरपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या एकूण 38 फेऱ्या होणार पार पडल्या.
 
मतमोजणीचं फेरीनिहाय चित्र -
पोस्टल मतांमध्ये भगीरथ भालके यांना आघाडी मिळाली
पहिल्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना 450 मतांची आघाडी
दुसऱ्या फेरीअखेर भगीरथ भालके यांना 5606 तर समाधान अवताडे यांना 5492 मते.
पाचव्या फेरीअखेर भालके यांना 14717 तर आवताडे यांना 14059 मते. भालके 658 मतांनी आघाडीवर.
दहाव्या फेरीअखेर अवताडे यांना 28885 आणि भालके यांना 27047 मतं
14व्या आणि 15व्या फेरीतही आवताडे यांची आघाडी कायम. 16 व्या फेरीअखेर आवताडे यांना 45 हजार 934 तर भालके यांना 44 हजार 706 मतं. आवताडे यांच्याकडे 1228 मतांची आघाडी.
20व्या फेरीत आवताडे 58 हजार 787 मत मिळवून भालके यांच्यापेक्षा 1741 मतांनी पुढे. भालके यांना 57 हजार 46 मतं.
आवताडे यांची निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल
25 व्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना 75 हजार 73 मतं मिळाली. तर भगीरथ भालके यांनी 68 हजार 739 मतं मिळवली. आवताडे यांना 6334 मतांची आघाडी
30 व्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना 89 हजार 37 मतं. दुसऱ्या क्रमांकावरील भालके यांना 82 हजार 127 मतं. आवताडे यांना 6637 मतांची आघाडी.
35 व्या फेरीअखेरही समाधान अवताडे यांची आघाडी कायम. 4449 मतांनी पुढे.
38 व्या फेरीअखेर समाधान आवताडे विजयी