शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2019 (09:50 IST)

मराठवाड्याचा विकास करणे गरजेचे, विकासाचा अनुशेष वाढत आहे

sambhaji patil
मराठवाडा महाराष्ट्र राज्यात सामील झाल्यापासूनच मराठवाडयाचा सर्वच क्षेत्रात विकासाचा अनुशेष वाढतच राहिला आहे. मराठवाडा व येथील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन विकासाचा अनुशेष भरुन काढण्यात येईल व मराठवाडयाला उजनीचे पाणी मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. येथील दयानंद सभागृहात आयोजित मराठवाडा विकास परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी जलतज्ञ राजेंद्र सिंह, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार विनायक पाटील, आमदार प्रशांत बंब, आमदार सुभाष साबने, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, ॲड मनोहर गोमारे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, मराठवाडयाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहीजे. लातूरसह मराठवाडयातून इतरत्र होणारे ब्रेन ड्रेन थांबविण्यासाठी येथेच त्याप्रकारच्या व्यवस्था निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लातूरसह मराठवाडयात दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध केल्या जात असून या पुढील काळात या भागातील एकही कुटुंब रोजगारासाठी स्थलांतर करणार नाही याकरिता उपाय योजना राबविण्यात येतील. तसेच उजनीच्या पाण्यासह संपूर्ण मराठवाडयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे निलंगेकर यांनी सांगून मराठवाडयाचा विकासाचा अनुशेष राहण्यास यापूर्वीचे नेतृत्वच जबाबदार होते, असे मत व्यक्त केले.