कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला- नितेश राणे
संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक झाल्यानंतर कोल्हापुरला नेण्यात आलं होतं. त्यावेळी 'उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला होता' असे गंभीर आरोप नितेश राणे यांनी राज्यसरकारवर केले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते.
राणे म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर मला एका प्रकरणात गोवण्यात आलं. यावेळी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात मला दाखल केलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी मला सिटी अँजिओग्राफी करण्याचा आग्रह केला. त्यावेळी माझं ब्लड प्रेशर लो होते ते मला कळत होतं. तरीही डॉक्टरांनी सिटी एन्जो करायला सांगितली.
तिथं सगळेच सरकारच्या बाजूचे नव्हते. काही आमच्याही ओळखीचे होते. तिथल्या कर्मचाऱ्यांनी येऊन सांगितले की सिटी अँजिओग्राफी करु नका. कारण त्यानिमित्ताने इंक शरिरात टाकायला लागते. इंक टाकून तुम्हाला मारुन टाकण्याची योजना आहे. असं तिथल्या कर्मचाऱ्याने सांगितल. त्यांनी यासाठी होकार देऊ नका असंही सांगितल."
"माझे ब्लडप्रेशर, शुगर लेव्हल लो दाखवत असतानाही रात्री पोलीस मला घेऊन जाण्यासाठी पाठवण्यात आले. पोलिसांना रात्री अडीच वाजता येऊन माझी अवस्था खराब असल्याचं पाहिल्यानंतर तेव्हा ते बाहेर गेले. तरीही वारंवार दबाव येत होता आणि मुंबई कलानगरच्या परिसरातून फोन येत होते. अशा प्रकारचे व्यवहार त्यावेळी सुरु होते. विरोधी पक्षातल्या नेत्यांना जीवंतच ठेवायचं नाही असा प्रकार राज्यात सुरु आहे," असे आरोप नितेश राणेंनी केले.