शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (07:45 IST)

दहावी आणि बारावीच्या परीक्षेला 17 नंबरचा अर्ज भरून बसणार्‍या विद्यार्थ्यांना अर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला 17 नंबरचा अर्ज भरून बसणार्‍या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विलंब आणि अतिविलंब शुल्कासह 24 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आणखी एक संधी मिळावी म्हणून मंडळाने मुदतवाढ दिली आहे.
 
राज्य मंडळामार्फत घेण्यात येणार्‍या एप्रिल-मे 2022 च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला खासगीरित्या प्रविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यास 16 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. मात्र त्याला मुदतवाढ देत हा कालावधी 6 डिसेंबर वाढवण्यात आला होता. आता अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ मिळाली असून विलंब शुल्क प्रती विद्यार्थी 100 रूपये घेऊन 13 ते 18 डिसेंबरदरम्यान दहावीचे अर्ज माध्यमिक शाळांना भरता येणार आहेत.
 
तर प्रती विद्यार्थी 25 रूपये घेऊन 13 ते 18 डिसेंबरदरम्यान बारावीचे अर्ज कनिष्ठ महाविद्यालयांना भरता येणार आहे. त्यानंतर शाळांनी तसेच कनिष्ठ महाविद्यालयांनी अति विलंब शुल्क प्रतीदिन प्रतीविद्यार्थी 20 रूपये घेऊन 19 ते 24 डिसेंबर दरम्यान दहावी तसेच बारावीचे अर्ज भरायचे आहेत. केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारले जाणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.