कॉंग्रेसची उमेदवारी सुधीर तांबे यांनाच होती…ही फारशी चांगली घटना नाही- नाना पटोले
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत नाट्यमय रित्या घडामोडी घडल्या. डॉ. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळूनही ऐनवेळी त्यांनी माघारी घेऊन आपला मुलगा सत्यजीत तांबे यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तांबे पिता पुत्राच्या या निर्णयानंतर राजकिय क्षेत्रात एकत खळबळ उडाली. ही घटना कॉंग्रेसला एक धक्का मानली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेसने सुधीर तांबे यांनाच उमेदवारी दिली होती. त्यामुळे जे घडले ती फारशी चांगली घटना नसल्याचे म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मलाही मिडीयाच्या माध्यमातून ही गोष्ट कळाली आहे. ही घटना काय आहे त्या गोष्टीची माहीती घेऊनच आम्ही यावर सविस्तर बोलू.”
माझी वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा झाली आहे असे सुधीर तांबे यांच्या वक्तव्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, “माझ्य़ाशी कोणतेही चर्चा झाली नाही. पण जे घडले ती फारशी चांगली घटना नाही. सत्यजीत तांबे हे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे त्यांनी कोणाला भेटावं हा त्यांचा प्रश्न आहे.” असे ते म्हणाले.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी सत्यजित तांबे यांनी भाजपकडे मदत मागितली तर सर्वतोपरी मदत करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor