शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जानेवारी 2018 (09:37 IST)

जनतेचा पैसा जाहिरातींवर खर्च करणाऱ्या सरकारची मानसिकता

जनतेचा पैसा जाहिरातींवर खर्च करणाऱ्या सरकारची मानसिकता म्हणजे मोफत का चंदन, घिस मेरे लल्ला - सुनिल तटकरे

भाजप-सेनेच्या या सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी आमची मागणी आहेच, पण त्याच बरोबर मागच्या चार वर्षांपासून ज्या शेतकऱ्यांचे वीज बील थकित आहे, त्यांचेही वीज बिल माफ झाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी बीड येथे केली. हल्लाबोल आंदोलनातील सभेत ते बोलत होते.

या सरकारची धोरणे अत्यंत फसवी आहेत. जनतेच्या पैशाचा अपव्यय या सरकारकडून केला जात आहे. 'मोफत का चंदन, घिस मेरे लल्ला' या म्हणीप्रमाणे भाजपचे हे निर्दयी सरकार लोकांच्या घामाच्या पैशाचा वापर स्वतःच्या जाहिरातीसाठी करत आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच, मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनाला ज्याप्रकारे जोरदार पाठिंबा मिळत आहे, ते पाहता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आता हे वारे वाहू लागले असल्याचा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  म्हणाले की बीड जिल्ह्यातून लाखो लोक रोजगारासाठी बाहेर जातात. हा प्रश्न गंभीर आहे. पण याबाबत प्रशासन आणि शासन काहीच का करत नाही? जिल्ह्याचे पालकमंत्री या संदर्भात काय करतात? हे सरकार जिल्ह्याचा विकास न करता वेगळ्याच विषयावर राजकारण करत आहे. पण आम्हाला माहीत आहे की बीड जिल्हा पवार साहेबांवर प्रेम करणारा जिल्हा आहे. भाजपच्या फसव्या जाहिरातबाजीमुळे २०१४ च्या निवडणुकांत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली नाही. पण २०१९ च्या निवडणुकीत या नाकर्त्या सरकारविरोधात जिल्ह्याने राष्ट्रवादीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  म्हणाले की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वर्षभरात होत आहेत. 'हल्लाबोल'च्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो की उरलेल्या काळात नीट काम करा, नाहीतर जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. बीड जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपद असूनही विकासाच्या बाबतीत जिल्हा खूप मागे आहे. पण बीड शहराला संदीप क्षीरसागर यांच्या रूपाने लोकांसाठी रस्त्यावर उतरणारा युवानेता मिळाला आहे. बीडचा विकास साधण्यासाठी राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना पुढे घेऊन पक्ष काम करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.