1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: जळगाव , गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (08:12 IST)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी होईल

The All India Marathi Literary
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल ७२ वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यात होत आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आयोजक संस्था असलेल्या मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर यांच्याकडून आलेल्या सुचनांवर काम करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे हे संमेलन यशस्वी होईलच, असा विश्‍वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला. या साहित्य संमेलनात वाचक, साहित्यिक, प्रकाशक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 
९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. या निमित्ताने आयोजक संस्था असलेल्या मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांच्यासह मंडळाचे सदस्य शामकांत भदाणे, रमेश पवार, नरेंद्र निकुंभ, बजरंग अग्रवाल, राजेंद्र भामरे, शाम पवार, अमळेनरचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली.
 
साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीतूनच पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन तसेच मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांना फोन लावून सविस्तर माहिती दिली. निधीसह संमेलनस्थळी प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात येणाऱ्या सुविधांविषयी आयोजकांना आश्‍वस्त केले. हे संमेलन भुतो न भविष्यती यशस्वी होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.