गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (15:33 IST)

दर्ग्याच्या दरवाजाला भगवा रंग देणार्‍यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

arrest
पीर बाबा दर्ग्याच्या ग्रीलच्या दरवाजाला भगवा रंग देऊन त्यामागे नाथांचा फोटो लावल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. शहरातील चितळे रोडवरील भराडगल्ली येथे असणार्‍या दर्ग्यामध्ये ही घटना घडली आहे.

दर्ग्यामध्ये भगवी शाल टाकून भिंतीवर ‘ओम नमो: आदेश’ असा मजकूर लिहिला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन नंदकुमार पळशीकर (रा. भराडगल्ली, चितळे रोड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून त्याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस नाईक तनवीर शेख यांनी फिर्याद दिली आहे.शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार अजय गव्हाणे व पोलीस नाईक शेख तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत होते.
यावेळी चितळे रोडवरील भराडगल्ली येथील दर्ग्याच्या ग्रीलच्या गेटला भगवा रंग देऊन त्यामागे नाथांचा फोटो लावल्याची माहिती शेख यांना मिळाली.त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

पांढर्‍या रंगाच्या छोट्या दर्ग्याच्या दरवाजाला भगवा रंग देऊन नाथांचा फोटो लावल्याचे निदर्शनास आले. तसेच दर्ग्याच्या आत भगवी शाल टाकून भिंतीवर ‘ओम नमो: आदेश’ असा मजकूर लिहिल्याचे आढळून आले. सचिन पळशीकर याने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे सचिन पळशीकर याला तोफखाना पोलिसांनी अटक केली.